News Flash

पोर्टफोलिओ बांधताना : कुठे गुंतवणूक करू ?

आता आपण दोन्ही गुंतवणूक प्रकारातील फरक काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय हे बघितले.

गुंतवणूकदारांना पडणारा हा अगदी साहजिक प्रश्न आहे. ‘पोर्टफोलियो बांधताना’ या माझ्या स्तंभाला प्रतिसाद म्हणून बऱ्याच वाचकांकडून विचारला गेलेला हा एक सामाईक प्रश्न आहे. आज त्यावरच लिहूया.
आता आपल्याला हे नक्कीच पटलंय की जर दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करायची असेल तर इक्विटीला (समभाग गुंतवणुकीला) पर्याय नाही. इक्विटीने नेहमीच इतर सर्व गुंतवणूक पर्यायांपेक्षा जास्त परतावा दिला आहे आणि हे काळाच्या कसोटीवर सिद्धही झाले आहे. जर विश्वास बसत नसेल तर खाली दिलेला तक्ता बघा:
एकदा आपल्याला पटले की दीर्घ मुदतीच्या संपत्ती निर्मितीसाठी इक्विटी हा सर्वात योग्य पर्याय आहे तर मग गुंतवणुकीसाठी आपल्याकडे दोन पर्याय आहेत :
समभागांमध्ये स्वत: प्रत्यक्ष गुंतवणूक करून किंवा म्युच्युअल फंडातील अप्रत्यक्ष गुंतवणुकीद्वारे.
या दोन्ही गुंतवणूक पर्यायांचे वेगवेगळे फायदे व तोटे आहेत. मग कुठे गुंतवणूक करायची, समभागांमध्ये का म्युच्युअल फंडात की दोन्हीत? हे ठरवण्यासाठी आपण दोन्हीमध्ये काय फरक आहे ते आधी समजून घेऊ :
१. समभागात स्वत: गुंतवणूक करणे:
जरी बरेच जण आपले मित्रमैत्रिणी/ नातेवाईक/ सहकारी किंवा इतर आपल्याला सांगत असले की शेअर बाजारात गुंतवणूक करून मला इतका फायदा झाला वगैरे. कदाचित त्यांना एकदा दोनदा फायदा झालाही असेल पण सातत्याने शेअरमध्ये गुंतवणूक करून फायदा मिळवणे तितकेसे सोपे नाही. एखाद्या शेअरमध्ये गुंतवणूक करण्यासाठी ती कंपनी कोणता व्यवसायात आहे, ते कोणत्या उद्योगक्षेत्रात मोडते, तिच्या स्पर्धक कंपन्या कोणत्या आहेत, कंपनीचा आर्थिक ताळेबंद, नफ्याचे प्रमाण किती आहे अशा अनेक गोष्टी बघाव्या लागतात. त्यासाठी ही माहिती जरी इंटरनेटवर उपलब्ध असली तरी अभ्यास करण्याची तयारी, सतत निरीक्षण व पाठपुराव्यासाठी मेहनत करण्याची तयारी आणि सातत्य या सर्व गोष्टींची गरज असते. बरेच लोक तांत्रिक विश्लेषण करून विशिष्ट शेअर घेण्याचे ठरवतात पण त्यासाठीसुद्धा सातत्याने अभ्यास करावाच लागतो. त्यासाठी विशेष कौशल्यही असावे लागते आणि ज्यांच्याकडे हे कौशल्य असते त्या लोकांकडे वेळ नसतो. हल्ली लोकांकडे स्वत:च्या कुटुंबाबरोबर घालवायलादेखील वेळ नसतो, तर मग यासाठी कुठून काढणार? येथेच म्युच्युअल फंड आपल्या मदतीला येतात. हा असा पर्याय आहे जो आपल्याला शेअर गुंतवणुकीचा फायदा तर देतो पण त्यासाठी जास्त वेळ आणि कौशल्याची तितकीशी गरज भासत नाही.
arth01
२. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक :
म्युच्युअल फंडामध्ये वेगवेगळ्या लोकांकडून पैसे जमा करून ते व्यावसायिक तज्ज्ञतेने वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतविले जातात. कोणत्या शेअरमध्ये आणि किती गुंतवायचे त्यासाठी निधी व्यवस्थापकांकडे स्वत:ची रिसर्च करणारा मोठा संघ असतो. ज्यांच्याकडे वेळही असतो व आवश्यक कौशल्येही असतात.
आता दुसरा मुद्दा आहे वैविध्याचा (डायव्हर्सिफिकेशन). जेव्हा आपण शेअर्समध्ये स्वत: गुंतवणूक करतो तेव्हा प्रत्यक्षात थोडेच शेअर्स घेऊ शकतो आणि मग एखादा शेअर जरी जास्त खाली आला तरी लगेच पोर्टफोलिओ खाली येतो. पण म्युच्युअल फंडात असे होत नाही. कारण ते एकाच वेळी वेगवेगळे ३०-४० शेअर्स घेतात आणि त्यामुळे दोन चार शेअर्सच्या खाली जाण्याने पोर्टफोलिओवर, परिणाम योजनेच्या नक्त मालमत्ता मूल्यावर (एनएव्ही) फारसा परिणाम होत नाही.
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, शेअर्समध्ये सारखी वध-घट होतच असते. काही काही शेअर्स तर +१५/२०% किंवा -१५/२०% खाली/वर देखील होतात आणि त्यामुळे पोर्टफोलिओच्या फायदा/नुकसानीवर परिणाम होतो. ज्यांच्यामध्ये जर असे चढ/उतार सहन करण्याची क्षमता असेल तरच त्यांनी शेअरमध्ये स्वत: गुंतवणूक करण्याविषयी विचार करावा. इतका जास्त चढ/उतार म्युच्युअल फंडात होत नाही.
म्युच्युअल फंड इतर गुंतवणूक पर्यायात म्हणजे डेट, सोने किंवा परदेशातील शेअर कंपन्या यामध्येदेखील गुंतवणूक करतात. जे आपण म्हणजे सामान्य गुंतवणूकदाराला शक्य नाही. एखाद्याकडे फक्त ५०० रु. असतील तरी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून ३०-५० शेअर्समधील एकत्रित गुंतवणुकीचा त्याला लाभ मिळू शकतो. जे थेट शेअरमध्ये गुंतवणुकीत कदापि शक्य नाही.
छोटय़ा गुंतवणूकदारांकडे फारसे पैसे नसतात. त्यामुळे तो जेव्हा पहिला पर्याय स्वत: गुंतवणूक करण्याचा निवडतो तेव्हा कितीही इच्छा असली तर त्याच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य तो आणू शकत नाही.
उदाहरणार्थ, समजा सध्या शेअर बाजार नरम आहे आणि असे बरेच चांगले शेअर्स आहेत की, ज्याच्यामध्ये आपण गुंतवणूक करायला हवी. कारण ते कमी किमतीत मिळत आहेत. पण जर माझ्याकडे १५००० रुपये असतील तरी मी सगळे चांगले शेअर घेऊ शकणार नाही. त्याउलट म्युच्युअल फंडात अगदी दरमहा ५०० रु. इतक्या अल्पतम गुंतवणुकीतूनही त्या शेअर्समध्ये अप्रत्यक्षरीत्या माझी गुंतवणूक होणारच.
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे मी सिप (एसआयपी) या गुंतवणूक पद्धतीतून दर महिन्याला थोडेथोडे पैसे टाकू शकतो जे थेट शेअर गुंतवणूक करताना करणे तितकेसे सोपे नाही.
मग आता काय करायचे?
आता आपण दोन्ही गुंतवणूक प्रकारातील फरक काय आहे, त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय हे बघितले. मला खात्री आहे की आता तुमच्यासाठी काय योग्य आहे ते तुम्हाला समजले असेल. जरी शेअर्समध्ये भरपूर पैसे मिळवून देण्याची क्षमता असली तरी योग्य शेअर योग्य वेळी खरेदी/विक्री करण्यासाठी कौशल्य आणि वेळ दोन्हीची गरज आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक एका रात्रीत दुप्पट कधीच होणार नाही पण त्यामध्ये जोखीम कमी आहे. त्यामुळे आता मी कशात गुंतवणूक करू? याचे उत्तर कोण ठरवणार? अर्थात तुम्हीच.
स्वाती शेवडे cashevade.swati @gmail.com
(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2016 1:08 am

Web Title: where to invest 2
Next Stories
1 बदला, नाही तर लुप्त व्हाल!
2 माझा पोर्टफोलियो : ‘बलवान’ पोर्टफोलियोसाठी
3 फंड विश्लेषण : भांडवली वृद्धी व मासिक उत्पन्नासाठी
Just Now!
X