‘कमी भावात घ्या आणि चढय़ा भावात विका’ हा शेअर बाजारात व्यवहाराचा आदर्श नियम आहे. मग आपण तीच चूक पुन्हा पुन्हा का करतो? मनात घर करून बसलेल्या नुकसानीच्या भीतीमुळेच आपण आणखी अधिक नुकसान ओढवून घेतो..
शेअर बाजार भीती आणि हव्यास या दोन भावनांच्या हिंदोळ्यावर चालत असतो. आपण जास्त नफ्याच्या अपेक्षेने शेअर्स खरेदी करतो. फक्त ८-९ टक्केच परतावा अपेक्षित असेल, तर आपण बँकेत ठेवी किंवा डेट म्युचुअल फंडात रक्कम गुंतवू. १२-१५ टक्के हवा असेल तर इक्विटी म्युच्युअल फंडात रक्कम गुंतवू, पण त्याहूनही जास्त परतावा अपेक्षित असेल तर स्वत: शेअर्समध्ये गुंतवणूक करतो.
आपण शेअर्समध्ये गुंतवणूक ‘टिप्स’वर किंवा पेपरच्या बातम्यांवर अवलंबून राहून करतो. स्वत:चा अभ्यास थोडा कमी पडतो. शेअर्स खरेदी केल्यावर त्या शेअरचा भाव रोज बघितला जातो. कंपनीची कामगिरी कशीही असो, आपल्या अपेक्षेप्रमाणे भाव वर जात नाही, खूपदा खालीच जातो. तात्पुरते असे वर/खाली होतच असते असे म्हणून सुरुवातीस याकडे आपण दुर्लक्ष करतो. पुढच्या पायरीवर, मग आपण कारणमीमांसा करतो. काय? तर, सध्या बाजार खाली जात आहे; परदेशी गुंतवणूकदार विक्री करत आहेत, देशाची/जगाची अर्थव्यवस्था, ब्रेग्झिट, वगैरे वगैरे. या ‘बहाण्यां’चे कारण आपली नुकसान सोसण्याची मानसिकता नसते.
परंतु बाजार अजूनही खाली जात राहतो व एका क्षणाला आपले नुकसान खूप जास्त होते. झाले ते बस्स झाले म्हणून आपण शेअर्स विकून टाकतो आणि भाव ‘हळूहळू वाढू’ लागतात. ते खूप वर गेल्यावर आपल्याला जाणवते पूर्वीच घेतले असते तर! (किंवा विकलेच नसते तर! किंवा ‘अ‍ॅव्हरेजिंग’ केले असते तर!) या ‘तर!’ला काही अर्थ नसतो. सर्व आर्थिक साक्षरता कार्यक्रमात, सर्व लेखात, पुस्तकांत सांगितले जाते, ‘कमी भावात घ्या आणि चढय़ा भावात विका’. मग आपण तीच चूक पुन्हा पुन्हा का करतो? कशामुळे आपल्याला नुकसान होते.
कार्ल रिचर्ड्स यांनी आपल्या ‘द बिहेव्यर गॅप’ या पुस्तकात ही संकल्पना खूप छान मांडली आहे. आपल्याला अपेक्षित परतावा आणि प्रत्यक्षात मिळणारा परतावा यामध्ये आपल्या भावना आणि आपली कृती येते. आर्थिक नियोजनकाराच्या सल्लय़ाने गुंतवणूक करणाऱ्यांचा परतावा, अपेक्षित परताव्याच्या खूप जवळपास असतो असे निदर्शनास येते. स्वत: निर्णय घेऊन गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये अपेक्षित आणि मिळालेल्या परताव्यात फरक (गॅप) जास्त असतो. हे असे का होते?
आपण जो पैसा खर्च झाला नाही, शिल्लक राहिला तो गुंतवत असतो (पुढील खर्चाच्या तरतुदीसाठी) म्हणून आपण गुंतवणुकीत भावनात्मकदृष्टय़ा अडकलेले असतो. मोठय़ा संकटाच्या काळात आपण तर्कशुद्ध विचार न करता भावनावश (इमोशनल) होऊन झटपट निर्णय घेतो. आपल्या कष्टाचा पैसा बुडू नये, ही भावना असते. छोटय़ा कालावधीत होणाऱ्या नफा/नुकसानीची काळजी नसते. सर सलामत तो पगडी पचास, या भावनेने थोडे नुकसान झाले तरी नंतर भरून निघेल, ही वृत्ती असते. गुंतवणूकदारांची ही भावनावश होऊन निर्णय घेण्याची वृत्ती, त्यांना गुंतणूक धरून ठेवण्यापासून (स्टे इन्व्हेस्टेड) परावृत्त करते.
या ठिकाणी आर्थिक नियोजनकार कामास येतो. तो एखाद्या योजनेत भावनात्मकदृष्टय़ा अडकलेला नसतो. त्याचा तुमच्याशी फार पूर्वीपासून परिचय असेल तर त्याला तुमचा स्वभाव माहीत असतो. तो तुम्हांस घाबरून निर्णय घेण्यापासून परावृत्त करतो. बाजार कायमच वर/खाली होत असतो. तेजीनंतर मंदी व मंदीनंतर तेजी येतच असते. आपल्या दीर्घ मुदतीच्या उद्दिष्टांसाठी गुंतवणूक शेअर्समध्ये (जोखीमयुक्त) असते. हे तो निदर्शनास आणून देतो. मग अपेक्षित परतावा आणि मिळणारा परतावा यातील दरी (गॅप) कमी होते. एखाद्या शेअर्सच्या कामगिरीपेक्षाही आपल्या वर्तनातील फरकावर (बिहेव्यर गॅप) मिळणारा परतावा अवलंबून असतो (अर्थातच शेअर चांगल्या कंपनीचा आहे हे गृहीत धरलेले आहे.) अल्प मुदतींमधील चढ-उतार पकडण्याच्या नादात, दीर्घ मुदतीतील प्रचंड फायदा गुंतवणूकदार गमावून बसतो. भीती आणि हव्यास या दोन्ही भावना नियंत्रित करून दीर्घ मुदतीचा विचार केल्यास जोखीम कमी होऊन, मोठय़ा परताव्याची शक्यता वाढते.
आपण आपला मेंदू जटिल समस्या सोडवण्यासाठी तयार करतो. आपली प्रवृत्ती तशी होत जाते. मग एखादे साधे-सोपे गणित आपण गुंतागुंत निर्माण करून सोडवतो. हाच नियम गुंतवणुकांनाही लागू पडतो, असे कार्ल रिचर्डस सांगतो. एखाद्या आर्थिक नियोजनकाराने साधा-समजण्यास सोपा प्लॅन बनवून दिला तर तो पटकन पचनी पडत नाही. त्याने सांगितले ६० टक्के शेअर्समध्ये गुंतवणूक करा, १० टक्के सोन्यात व ३० टक्के डेट फंडांत करा, तर गुंतवणूकदार एकच बॅलन्स फंड निवडतो. ज्यात ३५ टक्के शेअर्स, ३० टक्के डेरिव्हेटीव्ह्ज, १० टक्के सोने व २५ टक्के डेट योजना असतील, मग एखाद्या वर्षी बाजार खाली म्हणून परतावा कमी, तर पुढल्या वर्षी सोने खाली, व्याजदर वर गेले म्हणून परतावा कमी. ‘द बिहेव्यर गॅप’मध्ये लिहिल्याप्रमाणे आपल्याला मिळणारा परतावा ९० टक्के समतोल गुंतवणुकीमुळे (अ‍ॅसेट अलोकेशन) व फक्त १० टक्के शेअर्स, बाँड किंवा फंड योजना यावर अवलंबून असतो.
शेअर म्हटला की चांगला शेअर निवडणे महत्त्वाचे असतेच आणि बाजारात वॉरेन बफे किंवा राकेश झुनझुनवाला हे काय म्हणतात, कोणते शेअर्स निवडतात, याला महत्त्व असते. यात मागील काही वर्षांत विजय किशनलाल केडिया या नावाची भर पडली आहे. त्यांची ही शेअर बाजारातील पाचवी पिढी होय. वडील लवकर गेल्यामुळे १९७८मध्ये वयाच्या १८व्या वर्षी ते बाजारात दाखल झाले. १९७८ ते १९८९ बाजारात ट्रेडिंग केले. हाती शिल्लक शून्य. १९८९ला त्यांनी पाहिले, जे गुंतवणूकदार म्हणून बाजारात काम करतात ते खूप श्रीमंत आहेत आणि त्यांचे आयुष्य सुखी, समाधानी आहे. ते अभ्यासू आहेत आणि त्यांना मान आहे. त्यावेळेस त्यांच्या जवळ फक्त रु. ३५,०००/- होते ते त्यांनी पंजाब ट्रॅक्टर्स कंपनीत गुंतविले व नंतर पाचपट किमतीस विकले. त्या सुमारास सीमेंटवरील र्निबध उठले. मिळालेली सर्व रक्कम एसीसीचे शेअर्स घेण्यासाठी वापरली. ते शेअर्स रु. ३०००/-च्या वर भाव गेल्यावर विकले. असे करत, आज ही व्यक्ती ६५० कोटींची मालक आहे. एका चॅनलवाल्या चर्चेत, पुढे बाजार किती वर जाईल असा त्यांना प्रश्न आला. इथून चार पट म्हणजे २०२०पर्यंत एक लाख सेन्सेक्स होऊ शकतो असे त्यांनी उत्तर दिले. शेअर बाजारात तेजी आली की असेच मोठे आकडे सांगितले जातात. इथून दुप्पट झाला तरी चार वर्षांत काही वाईट नाही.
२० फेब्रुवारी २०१६ रोजी आयआयएम बंगलोरच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे व्याख्यान झाले. प्रत्येक यशस्वी गुंतवणूकदाराचे सांगणे सारखेच असते मग तो भारतीय असो किंवा परदेशी. विजय केडिया या भाषणात म्हणाले, ‘‘भारतीय लोकांपैकी जवळपास एक टक्का लोक शेअर्समध्ये व्यवहार करतात. त्यापैकी फक्त २५ टक्के यशस्वी होतात. कारण काय? शेअर्समधील गुंतवणूक हा व्यवसाय आहे. अतिशय विचारपूर्वक केला जाणारा, विवेकी व्यवसाय. याचे नियम संपूर्णपणे वेगळे आहेत. ते कोणत्याही अभ्यासक्रमात शिकवले जात नाहीत. याचा फंडामेंटल व टेक्निकल अ‍ॅनालिसीसच्या अन्वये अभ्यास करावा लागतो. कोणताही अभ्यास न करता, कोणताही पूर्वानुभव गाठीशी नसताना व आपली नुकसानीची जोखीम क्षमता विचारात न घेता केल्यास तो धंदा न होता सट्टा होतो. गुंतवणूकदार होण्यासाठी वेगळा दृष्टिकोन लागतो. ज्ञान, धैर्य आणि संयम लागतो.’’

शेअर बाजारात यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी दहा नियम
१)आपल्या मासिक खर्चाची तरतूद आपल्या इतर उत्पनातून करा. शेअर बाजारातील उत्पन्नावर अवलंबून राहू नका कारण बाजार खूप अस्थिर असतो. बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी आपली धोका पत्करण्याची क्षमता (मार्जिन ऑफ सेफ्टी) तपासून घ्या.
२) झपाटले गेल्यासारखे वाचन करा. माहिती मिळवा. वॉरेन बफे एकदा कागदाचा गठ्ठा दाखवत म्हणाले. यासारखे मी रोज ५०० कागद वाचतो. बाजार तुम्हाला त्याकडे कोणत्या नजरेने बघता त्याप्रमाणे बक्षीस देतो. तुम्हाला तो सट्टा वाटला तर सट्टा, धंदा वाटला तर भरपूर नफा.
३) आपल्या बचतीचा (उत्पन्नाचा नव्हे) काही भागच शेअर्समध्ये गुंतवा. समजा तुम्ही २५ टक्के गुंतवू इच्छिता तर आपली जोखीम क्षमता विचारात घेऊन १२ ते १५ टक्केच शेअर्समध्ये गुंतवा. कारण हा जोखीमयुक्त व्यवसाय आहे.
४) कर्ज काढून गुंतवणूक करू नका. ट्रेडिंग आणि लिव्हरेजच्या भानगडीत पडू नका. ट्रेिडग हा बारा महिने २४ तास करावा लागणारा धंदा आहे. दुसऱ्या कोणास ट्रेडिंगमध्ये फायदा होतो म्हणून तुम्ही करायला जाऊ नका.
५) गुंतवणूक पाच ते दहा वर्षांसाठी म्हणून करा. रोम शहराची उभारणी एका दिवसात झाली नाही असे म्हणतात. त्याचप्रमाणे कोणत्याही कंपनीची कथा पूर्ण होण्यास कालावधी जावा लागतो. मी नेहमीच छोटय़ा कंपन्या निवडतो. ज्या पुढे जाऊन मोठय़ा होतात व प्रचंड फायदा करून देतात.
६) कुशल, चांगले, पारदर्शी व्यवहार करणारे व्यवस्थापन असणाऱ्या कंपन्या निवडा. अशांना आपले नाव व प्रतिष्ठा जपायची असते. मग तुम्हाला कंपनीची काळजी नाही (तुमच्या गुंतवणुकीची) अन्यथा व्यवस्थापक मंडळ मजा करत आहे आणि तुम्ही तुमच्या गुंतवणुकीची काळजी करत बसला आहात असे होईल.
७) तुमची गुंतवणूक बाजारात असते आणि तुमचा नफा जोपर्यंत रोखीत रूपांतरित (एन्कॅश) होत नाही तोपर्यंत राहतो. बाजार कोसळला तर तो नाहीसा होतो. त्या जिवावर खर्च करू नका.
८) ठरावीक कालावधीत नफा रोखीत रूपांतरित (एन्कॅश) करत राहा आणि तो घर खरेदीसाठी वापरा. (घर विकून पैसे शेअर बाजारात लावा सांगणारेच खूप असतात!)
९) बाजार वर गेला म्हणून हुरळून जाऊ नका आणि खाली गेला म्हणून दु:खी होऊ नका. शारीरिकदृष्टय़ा, मानसिकदृष्टय़ा आणि आर्थिकदृष्टय़ा भक्कम राहा. आपण शेअर विकल्यावर, त्याचा भाव वर जातो म्हणून दु:ख करतो, नुकसान झाले म्हणून दु:ख करतो. पैसा कमी मिळाला म्हणून दु:ख करतो. हे दु:ख करणे थांबवा.
१०) नशिबाचा भाग खूप असतो म्हणून सत्कर्मे करा. चांगला माणूस बना. चांगली कर्मे केलीत तर ती परत तुमच्याकडे येतात.
(विजय केडिया यांनी सांगितलेले हे नियम सर जॉन टेंपलटन यांनीही वेगळ्या भाषेत क्रम बदलून सांगितले आहेत.)
जयंत विद्वांस – sebiregisteredadvisor @gmail.com
(लेखक ‘सीएफपी’ पात्रताधारक आर्थिक नियोजनकार व सेबीद्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)