गेल्या २० वर्षांत माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात मोठी क्रांती झाली आहे. दूरदर्शनची मक्तेदारी मोडून काढत अनेक नवीन दूरचित्रवाणी वाहिन्या उदयास आल्या. अर्थात सर्वच वाहिन्या यशस्वी झाल्या असे म्हणता नाही येणार. मात्र ‘झी’ या खाजगी वाहिनीने आपले बस्तान छान आणि भक्कम बसवले आहे. एस्सेल समूहाची झी एंटरटेन्मेंट ही भारतातील शेअर बाजारात नोंदणी होणारी पहिलीच माध्यम कंपनी आहे. सध्या जगभरात सुमारे १६९ देशांतून १०० कोटी जनता ‘झी’ वरील कार्यक्रम बघत असते. यात अमेरिकेखेरीज, युरोप, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशांचा देखील समावेश आहे. इंग्रजी आणि हिंदीखेरीज भारतातील सहा प्रांतीय भाषांमधूून बातम्या तसेच विविध मनोरंजनपर वाहिन्या असलेल्या ‘झी’चा संचार मनोरंजनासह जवळपास सर्वच म्हणजे बातम्या, बॉलीवूड, चित्रपट, शिक्षण, क्रीडा, संगीत, फूड, लाइफस्टाइल असा सर्वव्यापी वाहिन्यांत आघाडी घेतली आहे. तुलनेने नवीन असलेले मीडिया एंटरटेन्मेंटचे क्षेत्र भारतात वेगाने वाढत आहे. दररोज दूरचित्रवाणी बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. झी एंटरन्टेन्मेंटचे दुसऱ्या तिमाहीचे आíथक निकाल नुकतेच जाहीर झाले असून कंपनीने उलाढालीत गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत २३.८९% वाढ दाखवून ती १,३८४.९ कोटींवर नेली आहे. तर निव्वळ नफ्यात ८.७२% वाढ होऊन तो २४७.४ कोटींवर नेला आहे. जाहिरातीच्या उत्पन्नात ३४.७% वाढ झाली आहे. देशांत सध्या ६१% जनतेकडे दूरचित्रवाणी संच आहेत. मोठय़ा शहरांखेरीज लहान शहरे आणि खेडय़ापाडय़ातील जनतेपर्यंत पोहोचण्याकरीता भारतीय तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या दूरचित्रवाणीवरील जाहिरातींवर जास्त, जवळपास ४० टक्के भर देतात. जाहिरात हा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेल्या या क्षेत्राची वाढ भारतासारख्या प्रगतीशील देशांत येती काही वर्ष तरी चांगलीच राहील. तसेच झी सारख्या आघाडीच्या वाहिन्यांना याचा जास्त फायदा होईल. सध्या ४२५ रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर थोडा महाग वाटत असला तरीही मध्यम- दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी तो योग्य आणि सुरक्षित गुंतवणूक ठरू शकतो.
stocksandwealth@gmail.com

av-07