25 October 2020

News Flash

अमेरिकन आरोग्यव्यवस्थेचे ‘धडे’

देशातील आरोग्य क्षेत्राबाबतचे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समधील मतभेद आहेत

(संग्रहित छायाचित्र)

संजीव चांदोरकर

नागरिकांच्या आरोग्याचा देशाशी काहीही संबंधच नाही आणि आरोग्य ही ज्याची त्याची व्यक्तिगत बाब असल्यामुळे प्रत्येकाने आपापल्या ऐपतीप्रमाणे आरोग्यावरील खर्च करावा किंवा आरोग्यविमा घ्यावा, अशी व्यवस्था आपल्याआधी अमेरिकेने राबवली.. तिचा परिणाम म्हणजे दोन लाखांहून अधिक करोनाबळी!

बराक ओबामांनी २०१० मध्ये आणलेल्या, ‘ओबामा केअर’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या आरोग्य क्षेत्रविषयक कायद्यावर डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष बनण्याआधीपासून टीका करत होते. राष्ट्राध्यक्ष बनल्यावर ‘ओबामा केअर’ला घटनाबाह्य़ ठरवून त्या जागी नवीन (ट्रम्प केअर) कायदा आणण्याचा प्रयत्नदेखील त्यांनी केला. पुढच्या महिन्यात अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. रिपब्लिकन ट्रम्प विरुद्ध डेमोक्रॅटिक जो बायडन यांच्यात तापू लागलेल्या ‘वाग्युद्धा’त ‘ओबामा केअर’ चांगले की ‘ट्रम्प केअर’ अशा चर्चा झडत आहेत.

देशातील आरोग्य क्षेत्राबाबतचे रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समधील मतभेद आहेत. पण करोनाने अमेरिकन आरोग्यव्यवस्थेतील संरचनात्मक (स्ट्रक्चरल) प्रश्न नाटय़पूर्णरीत्या उघडे पाडले आहेत आणि त्यात बदल करावयास हवेत यावर अमेरिकेतील अनेकांचे मतैक्य होत आहे. भारतासकट अनेक देशांना त्यातून काही धडे मिळू शकतात.

एखाद्या देशातील करोनाबाधितांची संख्या सरकार- प्रायोजित लॉकडाऊनचे यश आणि त्याहीपेक्षा नागरिकांनी पाळलेल्या शिस्तीवर ठरते. करोना बळींच्या संख्येचे मात्र तसे नाही. बळींची संख्या सर्वच आर्थिक स्तरांतून आलेल्या गंभीर रुग्णांना देशातील आरोग्यव्यवस्थेकडून योग्य वैद्यकीय उपचार वेळेवर मिळतात की नाही, यावर ठरते. अमेरिकन आरोग्यव्यवस्था या अग्निपरीक्षेमध्ये नापास झाली आहे. अमेरिकेतील करोना-बाधितांच्या संख्येचे बिल तेथील नागरिकांच्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पनांवर फाडता येईल, पण जगात सर्वाधिक : २,१०,००० हून अधिक नागरिक करोनाला बळी पडण्याची कारणे त्या देशातील आरोग्यव्यवस्थेतील टोकाच्या विरोधाभासात आहेत.

टोकाचा विरोधाभास

२०१९ सालात वार्षिक ठोकळ उत्पादन २१ ट्रिलियन्स डॉलर्स (भारताच्या सातपट) आणि दरडोई उत्पादन ६५,००० डॉलर्स (भारताच्या ३० पट) असलेली अमेरिका जगातील पहिल्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. अमेरिकेच्या वार्षिक ठोकळ उत्पादनामध्ये आरोग्य क्षेत्रावर होणाऱ्या खर्चाचा वाटा (१९ टक्के) जगातच नव्हे तर सर्व श्रीमंत राष्ट्रांपेक्षाही जास्त आहे. ही जास्त टक्केवारी आरोग्य क्षेत्रासाठी शासनांनी केलेल्या भरघोस अर्थसंकल्पीय तरतुदींमुळे नव्हे तर जगातील सर्वात महागडय़ा आरोग्यसेवांमुळे आहे (त्याबद्दल नंतर लेखात येईलच). गेल्या १२० वर्षांत वैद्यकीय संशोधनातील जवळपास अर्धी नोबेल पारितोषिके अमेरिकेतील संशोधकांनी पटकावली आहेत. वार्षिक विक्रीच्या निकषावर जगातील पहिल्या दहापैकी निम्म्या औषध कंपन्या अमेरिकन आहेत.

एवढे सगळे असूनदेखील अमेरिकेचे आरोग्य व्यवस्थाविषयक अनेक निर्देशांक इतर विकसित राष्ट्रांच्या तुलनेत ‘रोगट’ आहेत. ‘कॉमनवेल्थ फंड’ या संस्थेने अमेरिकेतील आणि ‘ओईसीडी’च्या ३६ विकसित राष्ट्रांच्या गटातील आरोग्य क्षेत्राचा तुलनात्मक अहवाल (यापुढे लेखात ‘अहवाल’) जानेवारी २०२० मध्ये, म्हणजे करोना महासाथ फोफावण्यापूर्वी प्रसिद्ध केला आहे. ओईसीडीच्या इतर सभासद राष्ट्रांच्या तुलनेत बालमृत्यू, आत्महत्या, लठ्ठपणा, आयुर्मान आणि अस्थमा, सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग अशा चिवट रोगांनी बाधित रुग्णसंख्या अशा अनेक निर्देशांकात अमेरिका सर्वात खालच्या स्थानावर आहे.

कोणत्याही देशाच्या आरोग्य क्षेत्राची कसोटी लागते ती वेळेवर आणि योग्य वैद्यकीय उपचार पोहोचवून मृत्युशय्येवरील रुग्णांचे प्राण वाचवण्यात. या संबंधातील तुलनात्मक आकडेवारीदेखील अहवाल देतो. २०१८ सालात दर लाख लोकसंख्येमागे अमेरिकेत असे ११२ मृत्यू टाळता आले असते; फ्रान्स व स्वित्झर्लंडसाठी हेच आकडे अनुक्रमे ६० आणि ५४ आहेत. या आकडय़ांना नेहमीच असणारा वर्गीय आयाम अहवालाने पुढे आणलेला नाही; पण अमेरिकेतील करोनाबळींच्या विश्लेषणात तो लख्खपणे समोर येतो.

अमेरिकेतील करोनाबळी

अमेरिकेतील करोनाबळींमध्ये मूलनिवासी, कृष्णवर्णीय आणि लॅटिन अमेरिकेतील स्थलांतरितांची संख्या त्यांच्या अमेरिकेतील एकूण लोकसंख्येतील प्रमाणापेक्षा खूप जास्त आहे. कारण हे सारे समाजघटक आर्थिकदृष्टय़ादेखील दुर्बळ आहेत. एक लाख कृष्णवर्णीय लोकसंख्येत ८८ नागरिक करोनाला बळी पडले आहेत, तर दर लाख मूलनिवासी (रेड इंडियन), लॅटिन अमेरिकन आणि गौरवर्णीयांसाठी हीच आकडेवारी अनुक्रमे ७३, ५४ आणि ४० आहे.

अमेरिकेत आरोग्यविमा नसताना किंवा अपुरा असताना गंभीर आजारी पडणे म्हणजे दिवाळखोरीला नाही तर मृत्यूला निमंत्रण. घराचे भाडे, वीज बिल, अन्नधान्य, मुलांच्या फिया अशासारख्या अनिवार्य खर्चासारखा आरोग्यविमा नाही. तो ऐच्छिक खर्चात मोडतो. आरोग्यविमा-कवच विकत घेण्याचा निर्णय होता होईतो पुढे ढकलण्याची गरिबांची प्रवृत्ती असते. करोना येऊन आदळण्यापूर्वी पाच कोटी नागरिकांकडे कोणताही आरोग्यविमा नव्हता; दुसऱ्या पाच कोटी नागरिकांकडे होता, पण अपुरा होता. आर्थिक दुर्बल घटकांमध्ये करोना बळींचे प्रमाण जास्त असण्याचे पहिले कारण; दुसरे कारण आहे ‘उसन्या’ विमा कवचाचे.

‘उसने’ विमा कवच

अमेरिकेत आयकर कायद्यातील तरतुदींनुसार मालकांनी/ कंपन्यांनी आपल्या कामगारांचे आरोग्य विम्याचे हप्ते भरल्यास त्यांना आयकरात भरघोस सूट मिळते. या प्रावधानाचा फायदा उठवत अनेक उद्योग आपल्या कामगारांचे आरोग्य विम्याचे हप्ते विमा कंपन्यांकडे भरतात. यात वरकरणी मालकवर्ग लोककल्याणकारी वाटेल. पण तसे काही नसते. कामगारांना नोकरीवर ठेवताना मंजूर झालेल्या वार्षिक पॅकेजचा (कॉस्ट टू कंपनी) तो एक भाग असतो.

या पद्धतीत एक गंभीर त्रुटी आहे.

ज्या क्षणाला एखाद्या कामगाराची नोकरी सुटते त्या दिवसापासून त्याचे आरोग्यविमा कवच आपोआप गळून पडते. करोना महासाथीत लॉकडाऊन वा तत्सम उपाययोजनांमुळे तीन कोटी नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या; म्हणजे तेवढय़ा व्यक्तींच्या व त्यांच्या कुटुंबीयांचे विमा कवच गेले. तत्त्वत: व्यक्ती स्वत: नवीन आरोग्यविमा काढू शकतात. पण व्यक्तीने स्वत: काढलेले विमे मूलत: महागडय़ा आरोग्यव्यवस्थेमुळे न परवडणारे सिद्ध होतात.

महागडी आरोग्यव्यवस्था

अमेरिकेतील आरोग्यव्यवस्था खासगी आणि विमा क्षेत्राला केंद्रस्थानी व शासनाला दूर- परिघावर ठेवणाऱ्या बाजाराधिष्ठित तत्त्वांवर बेतलेली आहे. डॉक्टरी निदान, औषधे, चाचण्या, रुग्णालयांतील उपचार, शल्यक्रिया सर्वासाठी बाजारभावाप्रमाणे पैसे मोजावे लागतात. अमेरिकेत औषधांच्या किमतीवर सरकारचे प्रभावी नियंत्रण नाही. अनेक युरोपीय देशांमध्ये ते आहे. त्यामुळे अमेरिकेत अनेक औषधांच्या सरासरी किमती युरोपमधील तशाच औषधांच्या किमतीपेक्षा चारपट आहेत. महागडय़ा आरोग्यसेवांची इतरही काही कारणे आहेत. ती अशी:

(अ) अद्ययावत वैद्यकीय उपकरणांचा सढळ वापर : २०१८ सालात अमेरिकेत दर लाख लोकसंख्येमागे १११ एमआरआय काढले गेले; तर ओईसीडी राष्ट्रांची सरासरी ६५ आहे. ही सगळी उपकरणे अतिशय भांडवल सघन असतात. त्यामुळे त्याचे उपभोक्ता चार्जेस जास्त असतात.

(ब) रुग्णालयात भरती करण्यावर नको तेवढा भर : अमेरिकेत कमी गंभीर रोगांसाठीदेखील रोग्यांना रुग्णालयात भरती करून घेतले जाते, रोग्यांवर नको असताना अतिरिक्त उपचार केले जातात. एका अंदाजानुसार अमेरिकेत आरोग्य क्षेत्रात होणाऱ्या एकूण खर्चाच्या जवळपास ३० टक्के खर्च अनाठायी असतो.

(क) खर्चीक व्यवस्थापकीय प्रक्रिया : अमेरिकेत ‘वैद्यकीय-न्यायिक’ (मेडिको लीगल) कोर्टबाजी बरीच चालते. त्यामुळे वैद्यकीय उपचार करणारे आपल्यावर कोणतेही बालंट न येण्यासाठी सजग असतात. त्यात खूप चाचण्या, खूप कागदपत्रे व नोंदी आणि रेकॉर्ड सांभाळणे असते. या सगळ्यामुळे एकूण खर्चात बिगर वैद्यकीय खर्चाचे प्रमाण १० टक्क्यांपर्यंत जाते; जे ओईसीडी गटात तीन टक्क्यांच्या खाली आहे.

संदर्भबिंदू

कल्पना करा, कमीअधिक क्रयशक्ती असणारे दोन पुरुष अनुक्रमे ५०० आणि १००० रुपये किमतीचे, अर्थातच गुणवत्तेत फरक असणारे, एकेक शर्ट खरेदी करतात. कमी प्रतीचा शर्ट घालावयास भाग पडलेला पुरुष त्याबद्दल दु:खी वा त्रस्त होणार नाही. मात्र आरोग्य क्षेत्रात ‘माझ्याकडे अर्धेच पैसे आहेत तर मी अर्धाच बरा व्हायला तयार आहे,’ असे म्हणणारा कोठेच दिसणार नाही.

आपल्या देशात सार्वजनिक क्षेत्रातील दवाखाने, रुग्णालये बंद करत नेण्याचे आणि आरोग्यसेवा आरोग्य-विम्यामार्फत पोहोचवण्याचे संकल्प केले जात असताना धोरणकर्त्यांनी दोन गोष्टी ध्यानात ठेवाव्यात :

(१) देशातील कोटय़वधी कुटुंबे क्रयशक्तीअभावी ‘पुरेसा’ (हा शब्द सर्वात महत्त्वाचा) आरोग्यविमा, पुढच्या अनेक पिढय़ा, खरेदी करू शकणार नाहीत.

(२) तांत्रिकदृष्टय़ा, आरोग्य ही नागरिकांची व्यक्तिगत बाब मानली तरी नागरिकांचे निरोगी असणे, आजारपणामुळे कमीत कमी मानवी दिवस फुकट जाणे, त्यांचा उत्साह, त्यांची उत्पादकता यांचा जैव संबंध देशाच्या आर्थिक प्रगतीशी असतो.

लेखक ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अध्यापन करतात.

ईमेल : chandorkar.sanjeev@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 7, 2020 12:03 am

Web Title: article on american healthcare lessons abn 97
Next Stories
1 अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा लेखाजोखा
2 युरोपातील ‘कुंपण’धंदा
3 ‘करोना’त आंतरराष्ट्रीय स्थलांतरित..
Just Now!
X