News Flash

‘अस्थिर’ जागतिक वित्तक्षेत्र

केंद्रस्थानी असलेल्या अस्थिर वित्त क्षेत्राचे दुष्परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यस्वस्थेवर होऊ शकतात.

संग्रहित छायाचित्र

 

संजीव चांदोरकर

गेल्या १२ वर्षांत वित्त क्षेत्र पुरेसे स्थिर राहिलेले नाही. ही अस्थिरता करोनाने जे फटके अर्थव्यवस्थांना दिले, त्यामुळे वाढणारच. जमेची बाजू अशी की, नियामक यंत्रणांकडून हे सारे सावरले जाईल, अशा आशेला अद्यापही वाव आहे..

करोना येऊन आदळण्यापूर्वी गेली काही वर्षे अस्थिरच असणारे जागतिक वित्त क्षेत्र आता, करोना महासाथीमुळे अधिक अस्थिर होण्याची भीती व्यक्त होत आहे. केंद्रस्थानी असलेल्या अस्थिर वित्त क्षेत्राचे दुष्परिणाम संपूर्ण जागतिक अर्थव्यस्वस्थेवर होऊ शकतात.

अर्थव्यवस्थांमधील उत्पादन, व्यापारादी असंख्य चक्रे अव्याहत फिरती ठेवण्याचे महत्त्वाचे काम वित्तक्षेत्र करत असते; मानवी शरीरातील रक्ताभिसरणासारखे. रक्ताभिसरणात गंभीर व्यत्यय आल्यानंतर शरीरातील इंद्रियांच्या कार्यावर विपरीत परिणाम होतोच, पण काही नाजूक इंद्रियांतील पेशी कायमच्या मरूदेखील शकतात.

वित्त क्षेत्रातील कोणताही गंभीर बिघाड बिगरवित्तीय (उत्पादन, व्यापार) क्षेत्रालादेखील विकलांग बनवतो. साहजिकच राष्ट्रीय आणि जागतिक वित्तक्षेत्राची स्थिरता हा अनुक्रमे त्या देशाच्या केंद्रीय बँकांचा आणि नाणेनिधीसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा नेहमीच चिंतेचा विषय असतो. यासाठीच या संस्था आपल्या कार्यक्षेत्रापुरता ‘वित्त क्षेत्र स्थिरता अहवाल’ (फायनान्शियल स्टॅबिलिटी रिपोर्ट) प्रसिद्ध करीत नियमितपणे आढावा घेत असतात.

वित्त क्षेत्राच्या स्थिरतेचे महत्त्व

वित्त क्षेत्राच्या इमारतीची संरचना बरीच गुंतागुंतीची; पण त्यातील दोन खांब महत्त्वाचे : (१) वित्तसंस्था (बँका, अनेक प्रकारच्या बिगरबँकिंग वित्तसंस्था, विमा, पेन्शन, म्युच्युअल, प्रायव्हेट इक्विटी असे विविध फंड्स) आणि (२) वित्तीय बाजार (भागभांडवल, रोखे, कमोडिटीचा वायदे बाजार इत्यादी).

आधुनिक अर्थव्यवस्थांमध्ये वित्त क्षेत्र एकत्रितपणे काही महत्त्वाची कार्ये करीत असते. उदा.- (अ) अर्थव्यवस्थेतील तयार होणाऱ्या बचती व लागणाऱ्या गुंतवणुका यांचा ताळमेळ घालणे, (ब) वित्तव्यवहारातील जोखीम व्यवस्थापन आवाक्यात ठेवणे आणि (क) पैशाचे व्यवहार विनाव्यत्यय सुरू राहतील हे बघणे वगैरे.

भांडवली अर्थव्यवस्थांमध्ये अधूनमधून येतच राहणाऱ्या कमीअधिक तीव्रतेच्या तेजीमंदीच्या चक्रांमुळे वित्त क्षेत्रालादेखील धक्के बसतात. या धक्क्यांना सहन करीत वित्त क्षेत्र त्यांची नियत कार्ये करू शकत असेल तर ‘वित्त क्षेत्र स्थिर आहे’ असे मानले जाते.

करोना महासाथीमुळे जगभर लोकांचे जीव धोक्यात येणे, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था थंडावणे याचा अपरिहार्य परिणाम अनेक देशांच्या व जागतिक वित्त क्षेत्रावर होऊ घातला आहे. नाणेनिधीने (आयएमएफ) आपल्या एप्रिल २०२० मधील वित्त क्षेत्र स्थिरता अहवालात करोनामुळे आलेल्या संकटाचे वर्णन ‘जागतिक वित्त क्षेत्राला याआधी कधीही न बसलेला धक्का’ असे केले आहे. हे संकट जरी ‘न भूतो’ असले तरी हे लक्षात ठेवले पाहिजे की जानेवारीत करोना येऊन आदळण्यापूर्वी गेली अनेक वर्षे जागतिक वित्त क्षेत्राची स्थिरता फार काही आश्वासक नव्हती.

करोनापूर्व अस्थिरता

जागतिक वित्त क्षेत्राच्या कमकुवतपणाची मुळे त्यात २००८ नंतर झालेल्या दोन बदलांत शोधता येतील : (अ) न झेपणाऱ्या कर्जात सार्वत्रिक वाढ आणि (ब ) वाढलेल्या जोखीमयुक्त गुंतवणुका.

२००८ मधील ‘सबप्राइम क्रायसिस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागतिक वित्तारिष्टावर मात करण्यासाठी विकसित देशांच्या केंद्रीय बँकांनी क्षुल्लक व्याजदराने अमाप पैशाचा पुरवठा केला. उद्देश हा की, कर्जदार अशी स्वस्त कर्जे घेऊन नवीन उत्पादनक्षमता तयार करतील आणि अर्थव्यवस्थांना पुनर्चालना मिळेल. पण अनेक वर्षे मंदीसदृश अवस्थेत असणाऱ्या जागतिक अर्थव्यस्वस्थेत या धोरणांचे उलटेच परिणाम होऊन वित्त क्षेत्राच्या अस्थिरतेत भरच पडली. कशी ते पाहू.

न झेपणाऱ्या कर्जात सार्वत्रिक वाढ : गेल्या १२ वर्षांत जगातील कुटुंबे, कंपन्या आणि सरकारांच्या डोक्यावरील कर्जे सतत वाढतच आहेत. कर्जे घेऊन त्यातून उद्योगधंदा उभारून व्याज-मुद्दल परतफेडीची कर्जदाराची क्षमता वाढली तर काळजी नसते. पण दिसते असे की, कर्जाच्या प्रमाणात अर्थव्यवहार वाढले नाहीत. याचे प्रतिबिंब जगातील सर्व कर्जे आणि जागतिक जीडीपी (सकल राष्ट्रीय उत्पादन) यांच्या गुणोत्तरात पडते; जे आज कधी नव्हे एवढे ३०० टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यातून नजीकच्या काळात कर्जे थकून वित्त क्षेत्रातील अस्थिरता वाढू शकते.

जोखीमयुक्त गुंतवणुकीत वाढ : कमी व्याजदराने भरपूर पैसे उपलब्ध असले की गुंतवणूकदारांची अवास्तव जोखीम घेण्याची प्रवृत्ती वाढते. उदा. याच काळात जगभर शेअर्स, जमिनी, डेरिव्हेटिव्ह्ज अशा अनुत्पादक मत्तामध्ये गुंतवणुका भरमसाट वाढल्या आहेत. परिणामी या मत्तांची सट्टेबाजांनी ठरवलेली बाजार-किंमत आणि त्याचे खरे वाजवी मूल्य यात तारतम्य राहात नाही. एक दिवस अवाजवी किमतीचा फुगा फुटून सारे वित्त क्षेत्र धोक्यात येऊ शकते.

अस्थिरतेची लक्षणे

भविष्याबद्दलच्या अनिश्चितता वित्त क्षेत्राला नेहमीच उदास करतात. भविष्याबद्दल थोडी जरी अनिश्चितता जाणवली तर ऋणको कर्जे देताना हात आखडते घेतात; बँका त्यांच्याकडे भरपूर पैसे असूनही कर्जे द्यायला नाखूष असतात; अर्थव्यवस्था मंदावणार असेल तर शेअर मार्केटमध्ये मंदीवाले जोर पकडतात; प्रत्येकाने स्वत:कडची नकद स्वत:कडे ठेवल्यामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या अभिसरणात बाधा येते. ही व अशी वित्त क्षेत्राच्या अस्थिरतेची लक्षणे मानली जातात.

आणखी एक उदाहरण बोलके आहे. स्टॉकमार्केटवरील गुंतवणूकदार नजीकच्या काळाबद्दल किती चिंताग्रस्त आहेत याचे मोजमाप ‘व्होलॅटिलिटी इंडेक्स’ (व्हीआयएक्स) मधून केले जाते. त्याला ‘भय’ निर्देशांक (फिअर इंडेक्स) देखील म्हणतात. वॉलस्ट्रीटवरील ‘एस अ‍ॅण्ड पी ५००’ निर्देशांक आपल्याकडच्या सेन्सेक्ससारखा, ज्याच्या ‘व्हीआयएक्स’ची ऐतिहासिक सरासरी २०च्या खाली असते. फेब्रुवारीत २०च्या आसपास असणारा हा निर्देशांक, करोना काय उत्पात घडवू शकतो याचा अंदाज येऊ लागल्यानंतर (मार्चमध्ये) तब्बल ८३वर पोहोचला होता.

करोनामुळे ‘अस्थिरतेत’ वाढ

जागतिक वित्तक्षेत्रात गेल्या पाच महिन्यांत जे घडले त्यावरून भविष्याबद्दल काही अंदाज बांधले जाऊ शकतात. त्या घडामोडी अशा :

कंपन्यांच्या रोख्यांतील ‘अस्थिर’ गुंतवणुका : जागतिक कॉर्पोरेट रोखे बाजार खूप मोठा आहे. आर्थिक मंदीचा फटका जगातील मोठय़ा कंपन्यांना बसला आहे. कंपनीला मिळालेला ठोकळ नफा कंपन्यांनी धनकोंना द्यावयाच्या व्याजापेक्षाही कमी भरला तर त्याला ‘जोखमीतील कर्जे’ (डेट अ‍ॅट रिस्क) म्हटले जाते. जगभर कॉर्पोरेट क्षेत्राला दिल्या गेलेल्या ‘जोखमीतील कर्जा’चे आकडे वाढत आहेत. (५० ५० ट्रिलियन डॉलर्सच्या कॉर्पोरेट कर्जापैकी २० ट्रिलियन डॉलर्सची कर्जे जोखमीची आहेत). अशा काळात गुंतवणूकदार नवीन गुंतवणुकी करताना व्याजरूपी उत्पन्नाचा नाद सोडतात, त्यापेक्षा आपले मुद्दल सुरक्षित ठेवण्याला प्राधान्य देतात. जागतिक कॉर्पोरेट रोखे बाजारात अशा उणे परतावा (निगेटिव्ह रिटर्न) देणाऱ्या कॉर्पोरेट रोख्यांमध्ये गुंतवणुका वाढत आहेत.

गरीब देशांची परकीय चलनातील कर्जे थकण्याची शक्यता : विकसनशील देशांतील सरकारांनी परकीय चलनात काढलेल्या कर्जाचे बऱ्याच वेळा परतफेडीच्या दिवशी नूतनीकरण (रोल ओव्हर) होत असते. करोनामुळे तयार झालेल्या गंभीर अनिश्चिततेत धनको नूतनीकरणाला नकार देण्याची शक्यता आहे. परतफेडीसाठी लागणारे परकीय चलन त्या देशाला प्राय: निर्यातीतून कमवावे लागते. जागतिक व्यापारात घट आणि विविध देशांच्या स्वसंरक्षणात्मक पावित्र्यांमुळे एकूणच निर्यातीच्या शक्यता धूसर होत आहेत. गरीब देशांचे व्याज व मुदलाच्या परतफेडीचे व निर्यातीतून मिळणाऱ्या परकीय चलनाचे गुणोत्तर २००८ मध्ये १०० होते; ते २०१९ मध्ये १६० टक्के झाले आहे. काही गरीब राष्ट्रांसाठी हे गुणोत्तर ३०० टक्के आहे.

बँका कोसळण्याची भीती : वस्तुमाल/सेवा उत्पादक क्षेत्रातील चक्र तुटले की, साहजिकच कर्जदार बँकांकडे व्याज भरण्यास आणि कर्जे फेडण्यास असमर्थता व्यक्त करतात. हे तर सर्वसाधारण काळातही होतच असते. पण करोनाकाळाचे वैशिष्टय़ हे की, सर्वच बँकांचे बहुसंख्य कर्जदार एकाच वेळी अशी असमर्थता दाखवत आहेत. सर्वच देशांतील केंद्रीय बँका आपापल्या देशातील व्यापारी बँकांच्या पाठी उभ्या राहिल्या आहेत. २००८च्या तुलनेत बँकांची भांडवलाची पर्याप्तताही चांगली आहे. जगभरातील केंद्रीय बँका एकमेकांच्या संपर्कात आहेत हीदेखील जमेची बाजू आहे.

संदर्भबिंदू

भारतातील बँकिंग व वित्तक्षेत्र धीम्या गतीने जागतिक बँकिंग व वित्त क्षेत्राशी एकजीव होण्याची गेली काही दशके सुरू असणारी प्रक्रिया नजीकच्या काळातही सुरूच राहणार, हे नक्की. त्यामुळे देशाबाहेरील वित्त क्षेत्रात तयार होणाऱ्या अस्थिरतेच्या छोटय़ा-मोठय़ा वादळांचे परिणाम भारतीय वित्तक्षेत्रावर होणे अपरिहार्य आहे. भारतीय वित्त क्षेत्र अस्थिर होऊ नये यासाठी रिझव्‍‌र्ह बँक, सेबीसारखी नियामक मंडळे आणि केंद्र सरकार आवश्यक त्या उपाययोजना करतील अशी आशा आहे.

लेखक ‘टाटा समाजविज्ञान संस्थे’त अध्यापन करतात.

ईमेल : chandorkar.sanjeev@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 12:03 am

Web Title: article on unstable global financial sector abn 97
Next Stories
1 इथिओपियाचे ‘नोबेल’ उदाहरण
2 ‘साफ्ता’स्त्र वापरण्याची हीच वेळ!
3 जागतिक सागरी व्यापाराला ‘करोनाओहोटी’
Just Now!
X