मुंबई : व्यवसाय ठप्प झालेल्या जेट एअरवेजच्या ताफ्यातील विमाने तसेच कर्मचारी आपल्याकडे अहमहमिकेने ओढून घेणाऱ्या स्पर्धक इंडिगोमध्ये वर्चस्वाचा तिढा निर्माण झाला आहे. या खासगी नागरी विमान सेवेच्या दोन प्रवर्तकांमधील वाद चव्हाटय़ावर आल्याने. गुरुवारी भांडवली बाजारात कंपनीचे समभागमूल्य दणक्यात आपटले.

इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी या वादाच्या पाश्र्वभूमीवर, एकूणच नागरी हवाई वाहतूक क्षेत्राची वाढ खुंटली असून. काही कालावधीसाठी साचलेपण येणे अपरिहार्य असेल, असे स्पष्ट केले. कंपनीतील व्यवस्थापन वर्चस्ववादाची अप्रत्यक्ष कबुलीच दत्ता यांनी कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात दिली आहे.

इंडिगोची प्रवर्तक इंटरग्लोब एव्हिएशनचे दोन प्रवर्तक राहुल भाटिया व राकेश गंगवाल यांच्यातील कंपनीवरील वर्चस्वावरून निर्माण झालेल्या वादाने गंभीर रूप धारण केले आहे. कंपनीत सध्या भारताबाहेरील व्यवसायाची जबाबदारी असलेल्या गंगवाल यांनी इंडिगोच्या देशांतर्गत व्यवसायात वाढते लक्ष घातल्याने भाटिया यांची अस्वस्थतता वाढल्याचे सांगितले जाते. कंपनीच्या ताफ्यातील विमानांची संख्या तसेच क्षमता विस्ताराबाबत गंगवाल आग्रही असताना भाटिया यांनी त्यांच्या प्रस्तावाला विरोध केल्याने वाद झाला.

गंगवाल – भाटिया वादाबाबत कंपनीकडून मात्र काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. दरम्यान, याबाबत मुंबई शेअर बाजारानेही इंडिगोची प्रवर्तक इंटरग्लोब एव्हिएशनकडून उत्तर मागितले आहे.

देशांतर्गत नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात जवळपास ५० टक्के हिस्सा असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनमध्ये गंगवाल यांचा ३६.६९ टक्के तर भाटिया यांचा वाटा ३८.२६ टक्के आहे.

समभागाची आपटी

‘इंडिगो’ ही हवाई वाहतूक नाममुद्रा असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचा समभाग, व्यवस्थापनातील वर्चस्ववाद चव्हाटय़ावर आल्याने गुरुवारच्या व्यवहारात ९ टक्क्यांपर्यंत आपटला. मुंबई शेअर बाजारात गुरुवारअखेर ८.८२ टक्क्यांपर्यंत घसरल्यानंतर त्याचे समभागमूल्य १,४६६.६० रुपयांवर स्थिरावले. यामुळे कंपनीचे बाजारमूल्य एकाच व्यवहारात ५,४५५.८९ कोटी रुपयांनी रोडावत ५६,३७७.११ कोटी रुपयांवर स्थिरावले. इंडिगोमधील प्रवर्तकांच्या वादाबाबत जेएसए लॉ व खेतान अँड कंपनी या कंपनी विधि सल्लागार आस्थापनांकडूनही मत मागविले आहे. २००६ मध्ये स्थापित इंटरग्लोब एव्हिएशनची २०१३ मध्ये भांडवली बाजारात नोंदणी झाली तेव्हा भाटिया व गंगवाल यांचा एकत्रित हिस्सा ९९ टक्क्यांपर्यंत होता.