देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेने चालू आर्थिक वर्षांत पतपुरवठय़ात १० ते १२ टक्क्यांच्या वाढीचे लक्ष्य राखले आहे. थकीत कर्जाच्या दमदार वसुलीसह एकूण कर्जमागणीत सुधार होणे बँकेला अपेक्षित आहे.

विद्यमान २०१९-२० आर्थिक वर्ष हे बँकेसाठी सर्वार्थाने महत्त्वाचा बदल घडवून आणणारे आणि फेरउभारीचे ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी भागधारकांना आश्वस्त केले आहे. स्टेट बँकेच्या २०१८-१९ सालच्या वार्षिक अहवालात, सशक्त व्यावसायिक वाढ, पर्याप्त भांडवल आणि रोकडसुलभता या जोरावर बँकिंग उद्योगातील नेतृत्व आणि आघाडीचे स्थान टिकवून ठेवत भविष्यात मुसंडीच्या उज्ज्वल शक्यता दिसून येत आहेत, अशी त्यांनी ग्वाही दिली आहे.

भारतीय महिला बँकेसह पाच सहयोगी बँकांना विलीन करून घेणाऱ्या स्टेट बँकेने, सरलेल्या २०१८-१९ आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात, बहुउद्देशीय रणनीतीच्या अवलंबाचे इच्छित परिणाम मिळवीत, व्यावसायिक उभारीचे प्रारंभिक संकेत मिळविले आहेत, असे कुमार यांचे प्रतिपादन आहे.

मागील वर्षांतील सुचिन्हांचे पुढचे पाऊल म्हणून २०१९-२० साठी बँकेने काही ठोस उद्दिष्टे निर्धारित केली आहेत. त्यात पतपुरवठय़ात सुदृढ १० ते १२ टक्क्यांच्या वाढीसह वसुलीतही लक्षणीय प्रगतीचे उद्दिष्ट आहे. कुमार यांच्या मते, ‘‘सरलेल्या आर्थिक वर्षांने बँकेने समर्पक पायाभरणी केली आहे आणि त्या जोरावर विद्यमान आर्थिक वर्षांसाठी ठरविलेले लक्ष्य गाठण्याचा आम्हाला विश्वास आहे.’’

मार्च २०१९ अखेर समाप्त आर्थिक वर्षांत स्टेट बँकेने २,३०० कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कमावला आहे. त्याचप्रमाणे निर्लेखित केलेल्या कर्ज-खात्यातील वसुली ५७ टक्क्यांपर्यंत जाऊ शकली आहे. चालू आर्थिक वर्षांत वसुलीची मात्रा आणखी चांगली राहण्याचा बँकेचा आशावाद आहे. बँकेच्या ढोबळ अनुत्पादित मालमत्तेचे (ग्रॉस एनपीए) प्रमाण आधीच्या वर्षांतील १०.९१ टक्के पातळीवरून मार्च २०१९ अखेर ७.५३ टक्क्यांवर घसरले आहे. नक्त अनुत्पादित मालमत्तेचे (नेट एनपीए)चे प्रमाण तर २.७२ टक्क्यांनी सुधारून ३.०१ पातळीवर रोडावले आहे.

सरलेल्या आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धात बँकेने समर्पक पायाभरणी केली आहे आणि त्या जोरावर विद्यमान आर्थिक वर्षांसाठी ठरविलेले लक्ष्य गाठण्याचा आम्हाला विश्वास आहे.

–  रजनीश कुमार, स्टेट बँकेचे अध्यक्ष