वेतनवाढीच्या मागणीसाठी देशभरातील १० लाख बँक कर्मचारी बुधवारी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर आहेत. यामुळे विविध सार्वजनिक बँकांच्या ५० हजारांहून अधिक शाखा बंद राहणार आहेत. शाखा बंद असल्या तरी जोवर रोकड शिल्लक असेल तोवर एटीएममधून बँक ग्राहकांना रक्कम काढता येईल.
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीवरील चर्चा सोमवारी नवी दिल्लीत निष्फळ ठरली होती. बँक संघटनेने २३ टक्के वेतनवाढीची मागणी केली तर बँक व्यवस्थापन मात्र ११ टक्केवेतनवाढ देण्यासच तयार आहे. या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक बँकांचे नेतृत्व करणाऱ्या विविध नऊ संघटनांचे व्यासपीठ असेल्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (यूएफबीयू) बुधवारच्या एक दिवसाच्या संपाची हाक दिली आहे. यामध्ये १० लाखांहून अधिक कर्मचारी सहभागी होणार असून विविध शाखा तसेच एटीएमचे व्यवहार कोलमडणार आहेत.
संपानिमित्त बुधवारी दुपारी १२ वाजता आझाद मैदान येथून मोर्चा निघणार असून त्याचे नंतर सभेत रूपांतर होईल. या वेळी बँक संघटनेचे नेते आंदोलक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करतील.