सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरण विरोधातील गेल्या दोन दिवसांतील संप मोडून निघाल्यानंतर आता २९ जुलैच्या आंदोलनाची घोषणा बँक कर्मचारी, अधिकारी संघटनेने केली आहे. या एक दिवसाच्या संपात सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील बँकाही सहभागी होणार आहेत. पाच सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी संघटनेने १२ व १३ जुलैचा संप घोषित केला होता. यानुसार पहिल्या दिवशी पाच सहयोगी बँका, तर दुसऱ्या दिवशी सर्व सार्वजनिक बँका सहभागी होणार होत्या. मात्र एकूणच हा विषय मुख्य कामगार आयुक्तांकडे प्रलंबित असल्याचा दावा करत पाच सहयोगी बँकांच्या व्यवस्थापनाने सोमवारीच (११ जुलै) दिल्ली उच्च न्यायालयात संपाविरुद्ध धाव घेतली होती. त्यावर संप स्थगित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. हे प्रकरण आता २८ जुलै रोजी सुनावणीसाठी येणार असल्याने २९ जुलैच्या संपाची हाक नऊ बँक संघटनांचे नेतृत्व करणाऱ्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स’ने (यूएफबीयू) दिली आहे.