आयातीत इंधनासाठी खर्ची पडणारे बहुमोल विदेशी चलन वाचविण्याचा उपाय म्हणून पुढे आलेला पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिश्रणाचा पर्याय हा नजीकच्या काळात १० टक्के मात्रेपर्यंत वाढविला जाऊ शकेल. देशभरात सर्वत्र ५ टक्के इथेनॉल मिश्रणाची प्रक्रिया सुस्थापित झाल्यानंतर असा विचार करता येईल, असे संकेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री वीरप्पा मोईली यांनी दिले.
पेट्रोलमध्ये मिश्रणासाठी इथेनॉलचा मोठय़ा प्रमाणात पुरवठा मिळविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले जावेत, असे सोमवारी मोईली यांनी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) च्या व्यवस्थापनाला आवाहन केले. आजच्या घडीला देशभरातून इथेनॉलचा पुरवठा मिळविण्यासाठी बीपीसीएल ही सर्व तेल कंपन्यांमध्ये नोडल एजन्सी म्हणून कार्यरत आहे. इथेनॉलचा पुरेसा आणि स्थिर पुरवठा प्राप्त होऊ लागल्यास पेट्रोलमधील त्याची मात्रा सध्याच्या ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढविली जाईल, असे सूतोवाच मोईली यांनी बीपीसीएलच्या माहुल येथील रिफायनरीला भेट दिली असताना केले. यासमयी त्यांच्यासोबत बीपीसीएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आर. के. सिंग हेही होते. विस्तारासाठी जागेची मोठी अडचण असतानाही या रिफायनरीची एकूण तेलशुद्धीकरण क्षमता १२ दशलक्ष मेट्रिक टनावर गेली आणि वार्षिक सरासरी १०६ टक्के क्षमतेने ती कार्यरत असणे या बाबी कौतुकास्पद असल्याचे उद्गारही पेट्रोलियममंत्र्यांनी काढले.