वाढत्या स्मार्टफोन, टॅबलेटमुळे व्यवहार हिस्सा १० टक्क्य़ांवर
वाढत्या स्मार्टफोन आणि टॅबमुळे भांडवली बाजारातील व्यवहारही आता हातात सामावलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या मंचावर होऊ लागले आहेत. म्युच्युअल फंडसारख्या लोकप्रिय गुंतवणूक प्रकाराकरिताही तंत्रज्ञानातील पुढचे पाऊल अ‍ॅप पसंतीचे ठरू लागले आहे. मोबाईल अथवा टॅबलेटमध्ये अ‍ॅप डाऊनलोड करून फंडांतील व्यवहार करण्याचे प्रमाण १० टक्क्य़ांपर्यंत पोहोचले आहे.
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या हाती म्युच्युअल फंड गुंतवणूक ‘अ‍ॅप’ येऊन १८ महिन्यांचा काळ लोटला आहे. सुरवातीला हे ‘अ‍ॅप’ वापरून कुतुहलापोटी केलेल्या गुंतवणुकीची जागा सवयीने घेतली असून वार्षकि ३०,००० कोटीच्या होणाऱ्या ‘एसआयपी’पकी १० टक्के व्यवहार हे ‘अ‍ॅप’ वरून केले असल्याचे आढळून आले आहे.
या प्रकारच्या व्यवहारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून हे व्यवहार प्रामुख्याने इंरनेट किंवा स्मार्टफोनचा वापर करून होत असल्याचे आढळत आहे. केवळ तरुणांतच नव्हे तर जेष्ठ नागरिकांनाही या व्यवहाराच्या सुविधेने भुरळ पाडल्याचे चित्र आहे.
‘मी माझे सर्व म्युच्युअल फंडाचे व्यवहार अ‍ॅप वापरून करत आहे. माझ्यासारख्या व्यस्त असलेल्या व्यक्तीला एखादा व्यवहार एक टीचकीवर करता येतो’, असे मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या अ‍ॅड. व्हटकर यांनी ‘लोकसत्ता’ल सांगितले.
सुधीर मुरलीधर जोशी हे एका मध्यम समूहाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात उच्च अधिकारी आहेत. त्यांचे वेतन बँकेत जमा होताच घरखर्चाला आवश्यक पसे बाजूला काढून उरलेले पसे दुसऱ्या दिवशी म्युच्युअल फंडांच्या लिक्विड फंडात जमा करतात. लिक्वि ड फंडातून ‘सिस्टीमॅटिक विथड्रोवाल’ने त्यांच्या सुरू असलेल्या म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’मध्ये गुंतवणूक होत असते.
‘मागील दोन वर्षांत मी गुंतवणूक सल्लागाराशी गुंतवणुकीच्या तपशिलासाठी किंवा अन्य तत्सम गोष्टीसाठी संपर्क केलेला नाही. माझ्या गुंतवणुकीचा तपशील पाहणे किंवा नवीन ‘एसआयपी’ सुरू करणे किंवा थांबवणे हे अ‍ॅपच्या माध्यमातून क्षणात शक्य झाले आहे’, असे जोशी सांगितले.
डोंबिवलीच्या संध्या या गृहिणी असून गेल्या १० वर्षांपासून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करीत आहेत. त्यांनी एचडीएफसी म्युच्युअल फंडाच्या ‘अ‍ॅप’चा वापर करून स्मार्टफोनच्या माध्यमातून पहिल्यांदाच म्युच्युअल फंडाच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये गुंतवणूक सुरू केली केली.
‘प्रत्येकाच्या व्यस्त कार्यबाहुल्यामुळे आपली व सल्लागाराची वेळ जुळणे, सल्लागार येतो तेव्हा नेमकी चेक बुक संपलेले असणे आदी प्रसंगापासून डिजिटल क्रांतीमुळे सुटका झाली आहे’, असे त्यांनी सांगितले.
स्टेट बँकेसकट सर्वच आघाडीच्या बँकांच्या बँकिंग व्यवहाराच्या ‘अ‍ॅप’मध्ये म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक यासारख्या खाजगी बँका आघाडीच्या म्युच्युअल फंड वितरक आहेत. यामध्ये या अ‍ॅपचा मोठा वाटा आहे. म्युच्युअल फंडात ‘स्वीच, सिप सुरु करणे, सिप थांबविणे, आपल्या खात्यात जमा असणारी रक्कम पाहणे हे सर्व एका क्लिकवर शक्य झाले आहे. ‘मायकॅम्स’ हे अ‍ॅप म्युच्युअल फंडाच्या व्यवहारांची नोंद ठेवणाऱ्या ‘कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सíव्हसेस’ अर्थात ‘कॅम्स’ने विकसित केले असून एप्रिल २०१४ मध्ये गुंतवणूकदारांना उपलब्ध झालेल्या या ‘अ‍ॅप’द्वारे सुरू असलेल्या ‘एसआयपी’ने ५५० कोटींचा टप्पा पार केला आहे. अ‍ॅपचे प्रामुख्याने चार प्रकार आहेत. पहिला, बँकांनी आपल्या इंटरनेट बंकिंगच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेले अ‍ॅप. दुसऱ्या प्रकारात मोडणारे फंड्स सुपरमार्ट डॉटकॉमसारख्या देशात व विदेशात भारतातील म्युच्युअल फंड विपणाचे जाळे असलेल्या कंपन्यांनी विकासिते केलेली अ‍ॅप. तिसऱ्या प्रकारात आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल म्युच्युअल फंडाने विकसित केलेले ‘आयप्रूटच’ किंवा अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे ‘इझीअ‍ॅप’सारखे अ‍ॅप यांचा समावेश होतो. अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या एकूण व्यवहारापकी १० टक्के व्यवहार ‘इझीअ‍ॅप’च्या माध्यमातून होत आहे, अशी माहिती देण्यात आली.

सध्या म्युच्युअल फंडात ४० टक्के गुंतवणूक ही प्रमुख चार महानगरांच्या व्यतिरिक्त शहरातून येत आहे. मोठे भौगोलिक क्षेत्र असलेल्या आपल्या देशात यामुळे म्युच्युअल फंड गुंतवणुकीला मोठी चालना मिळाली आहे. माझे गुंतवणूकदार महाड पासून ६० ते ७० किलो मीटर त्रिज्येच्या परिघात आहेत. गुंतवणूकदाराची गरज समजाऊन घेतल्यावर दिलेल्या सल्ल्यानुसार गुंतवणुकदार स्वत:ची गुंतवणूक स्वत: करू शकतो. ‘अ‍ॅप’मुळे म्युच्युअल फंडांचे अर्जाची हाताळणी करावी लागत नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूक एका टीचकीवर आली आहे. – रोमन सेठ, म्युच्युअल फंड विक्रेते, महाड, जिल्हा – रायगड.