भांडवली बाजाराप्रमाणे सराफा बाजारातही चालू सप्ताहात सलग मूल्यघसरण नोंदली गेली आहे. गेल्या सलग सहा व्यवहारांत सोन्याचे दर उतरते राहिले आहेत.

मुंबईच्या सराफा बाजारात सोन्याचे स्टॅण्डर्ड प्रकारच्या धातूचे दर तोळ्यासाठी त्यांच्या विक्रमी टप्प्यापासून १० हजार रुपयांनी कमी स्तरावर आले आहेत. तर मौल्यवान धातूचा सद्यदर हा गेल्या आठ महिन्यांतील किमान नोंदला गेला आहे. तर वर्ष २०२१ मध्ये आतापर्यंत सोने दर ८ टक्क्य़ांनी रोडावले आहेत.

सोने ऑगस्ट २०२० मध्ये १० ग्रॅमसाठी विक्रमी अशा ५६ हजार रुपयांवर झेपावले होते. ते आता तोळ्यामागे ४६ हजार रुपयांवर येऊन ठेपले आहेत. तर चांदीचा किलोचा भाव आता ६८,५०० रुपयांनजीक आहे. पांढरा धातू वर्षभरापूर्वी तुलनेत कमी, ५६,२०० रुपयांपर्यंत होता. वर्षांच्या सुरुवातीला सोने ५० हजार रुपयांच्या आसपास होते.

मौल्यवान धातूच्या दरातील चकाकी पुन्हा गडद होण्याचा अंदाज विविध दलाली तसेच सराफ पेढय़ांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेत रोख्यांवरील व्याज तसेच डॉलरच्या मूल्याचा हा परिणाम असल्याचे मानले जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने तसेच चांदीच्या दरांमध्ये उतार अनुभवला जात आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पात मौल्यवान धातूवरील आयात शुल्क १२.५ टक्क्य़ांवरून ७.५ टक्क्य़ांवर आणण्याचा प्रस्ताव आहे. मात्र प्रत्यक्षात सोने-चांदीवर (कृषी पायाभूत विकास अधिभार व सामाजिक न्याय योजना कर) १०.७५ टक्के कर लागू होणार आहे. परिणामी, मौल्यवान धातूची मागणी वाढून वर्ष-दिड वर्षांत सोने ६५ हजार (तोळा) तर चांदी ८८ हजार (किलो) रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

– नवनीत दमानी, उपाध्यक्ष (वायदे बाजार विश्लेषक),  मोतीलाल ओसवाल फाय.सर्व्हि.