तुमचा ‘पॅन’ वैध आहे का, ते असे तपासा!

एकाच व्यक्तीच्या नावे एकापेक्षा अधिक ‘पॅन’ अर्थात प्राप्तिकर विभागाच्या कायम खाते क्रमांकाविरुद्ध सरकारने मोहीम उघडली आहे. सरकारने १७ जुलै २०१७ पर्यंत अशी तब्बल ११.४४ लाख पॅन रद्दबादल केली आहेत. उल्लेखनीय म्हणजे यात गफलतीचीही शक्यता दिसून येत आहे. कारण एकाच व्यक्तीच्या नावे अनेक पॅन असण्याबरोबरच, एकच पॅन क्रमांक अनेक व्यक्तींना वितरित केला गेला असल्याचेही आढळून आले आहे. शिवाय अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावे ‘पॅन’ मिळविले गेल्याचीही उदाहरणे आहेत. त्यामुळे गैरव्यवहार व करचुकवेगिरीचा उद्देश नसला तरी प्रामाणिक करदात्यांनाही या कारवाईचा फटका बसला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

म्हणूनच रद्दबादल ठरलेल्या ‘पॅन’मध्ये आपलेही पॅन कार्ड नाही ना याची खातरजमा करणे उपयुक्त ठरेल. तर ते तपासण्याचे काही सोपे उपाय खालीलप्रमाणे –

१. प्राप्तिकर विभागाच्या ई-फायलिंग वेबस्थळावर जावे लागेल. http://www.incometaxindiaefiling.gov.in या वेबस्थळाच्या होम पेजवर ‘सव्‍‌र्हिसेस’ या मथळ्याखाली ‘नो युअर पॅन’ असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

२. यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल. यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, धर्म, जन्मतारीख आदी तपशील भरून द्यावा लागणार आहे. या माहितीत ‘पॅन’साठी अर्ज करताना दिलेला मोबाइल क्रमांकही नमूद करा.

३. ही सर्व माहिती भरल्यानंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ‘ओटीपी’ (वन टाइम पासवर्ड) येईल. हा ओटीपी नमूद केल्यानंतर ‘व्हॅलिडेट’ ही कळ दाबा.

४. तुमच्या माहितीवर एकाहून अधिक ‘पॅन’ नोंद केलेले असतील तर ‘तुमच्या नावावर एकाहून अधिक पॅन कार्ड असून जास्तीची माहिती द्या’ अशी नोटीस तुमच्या संगणकाच्या पडद्यावर येईल. यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचे नाव किंवा इतर अनेक प्रश्न विचारण्यात येतील.

५. विचारलेली माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढच्या पृष्ठावर जाल, ज्या ठिकाणी तुमचे पॅन वैध आणि सक्रिय असल्याचा शेरा ‘रिमार्क’ स्तंभात दर्शविला जाईल.

पॅन कार्ड आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत आहे. या मुदतीत आधार कार्ड पॅन कार्डशी जोडले नाही तर पॅन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. या प्रक्रियेपश्चात तुमचे पॅन अवैध ठरल्याचे आढळले तरच ती तुमच्यासाठी चिंतेची बाब असेल. तथापि पॅन अवैधतेसंबंधाने सनदी लेखाकाराच्या सल्ल्याने आवश्यक त्या दुरुस्ती उपाययोजना तातडीने कराव्या लागतील.