घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनवाढीच्या दरात सरलेल्या जानेवारीत २.०३ टक्के वाढ नोंदविली गेली. हा या महागाई दराचा ११ महिन्यांतील उच्चांकी स्तर आहे. बिगर-खाद्य उत्पादित वस्तू महागल्याचा दिसून आलेला थेट परिणाम असून, पुढील काही महिन्यात भाववाढीचा हा कल असाच सुरू राहणे अपेक्षित आहे.

यापूर्वीचा, डिसेंबर २०२० मधील घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर १.२२ टक्के, तर वर्षभरापूर्वी जानेवारी २०२० मध्ये तो ३.५२ टक्के नोंदविण्यात आला होता.

उत्पादित वस्तूंसह, इंधन आणि विजेच्या दरातील वाढ, खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या किमती वाढल्याने जानेवारीत घाऊक किमतींवर आधारित चलनवाढीच्या दरात तीव्र स्वरूपाची वाढ दिसून आल्याचे, सोमवारी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने ही आकडेवारी प्रसिद्ध करताना स्पष्ट केले.

खाद्यान्न क्षेत्रातील चलनवाढीचा दर मात्र जानेवारी उणे २.८ टक्के असा घसरता राहिला. अनुक्रमे २०.८२ टक्के आणि २२.०४ टक्के अशा उतरलेल्या भाज्या व बटाटय़ांच्या किमती याला कारणीभूत ठरल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले.

खाद्यान्न आणि इंधन/ ऊर्जा या किमती अस्थिर व निरंतर बदलत असलेल्या घटकांना वगळून, मोजल्या जाणाऱ्या ग्राहक किमतीवर आधारित महागाईचा दर (कोअर इन्फ्लेशन) सरलेल्या जानेवारीत ५.१ टक्के असा २७ महिन्यांचा उच्चांक गाठणारा नोंदविला गेला आहे. वाढती मागणी आणि त्यामुळे किमती आणखी बळावण्याची शक्यता पाहता, एप्रिल ते जून या आगामी तिमाहीत तिचा चढता क्रम सुरूच राहील, असा ‘इक्रा’ या पतमानांकन संस्थेचा कयास आहे.

पेट्रोल-डिझेलमध्ये सलग सातवी दरवाढ

महागाईला खतपाणी घालणारी पेट्रोल-डिझेलमध्ये सोमवारी सलग सातव्या दिवशी, अनुक्रमे २६ पैसे आणि २९ पैसे प्रति लिटर वाढ करण्यात आली. देशभरात सर्वच राज्यांमध्ये परिणामी या इंधनाच्या किमती सार्वकालिक उच्चांकाला पोहोचल्या आहेत, तर राजस्थानमध्ये पेट्रोल शंभरीच्या वेशीवर म्हणजे प्रति लिटर ९९.५६ रुपयांवर पोहोचले आहे. ब्रँडेड पेट्रोलच्या किमतींनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशात १०० रुपयांपल्याड मजल मारली आहे. सलग सात दिवसांत पेट्रोल २.०४ रुपयांनी तर डिझेल २.२२ रुपयांनी महागले आहे.