पाच वर्षांत अपघातांचे प्रमाण निम्म्याने कमी करण्याचे नितीन गडकरी यांचे लक्ष्य
रस्ते अपघात येत्या पाच वर्षांत पन्नास टक्क्य़ांनी कमी करण्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील, केंद्र सरकारने त्यासाठी योजना आखली आहे असे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने रस्ते अपघात कमी करण्यावर लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, असे सांगून ते म्हणाले की, देशात ७२६ अपघात प्रवण क्षेत्रे निश्चित केली आहेत.
अखिल भारतीय संपादक परिषदेत त्यांनी सांगितले की, महामार्गाच्या बांधणीत प्रगती झाली आहे. देशात सध्या दिवसाला १८ कि.मी रस्ते बांधले जातात. मार्च अखेरीस हे उद्दिष्ट दिवसाला ३० कि.मी रस्ते बांधण्याचे असेल.
दिवसाला शंभर किलोमीटर रस्ते बांधण्याचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्टही सरकारने ठेवले आहे. सध्या ९७ हजार किलोमीटरचे महामार्ग आहेत आम्ही एकूण दीड लाख किलोमीटरचे महामार्ग पूर्ण करणार आहोत व हे प्रमाण राज्यांशी चर्चेनंतर १.७५ लाख किलोमीटपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
एप्रिल २०२० पासून भारत-६ मानके लागू केली जाणार असून त्यामुळे प्रदूषण कमी होईल. वाहनात इथेनॉल, जैव डिझेल, जैव सीएनजी व विद्युत वाहने यांचा मिश्र वापर केला गेला पाहिजे. राष्ट्रीय जलमार्ग विधेयक २०१५ लोकसभेत मंजूर झाले असून ते आगामी अधिवेशनात राज्यसभेत येईल. देशात जलमार्गाचे प्रमाण वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सध्याच्या पाच जलमार्गासह आम्ही एकूण १११ जलमार्ग बांधणार आहोत. कच्छमधील कोरी खाडी ते राजस्थानातील जालोरेदरम्यान कालवा मार्ग सुरू करण्यासाठी पर्यावरण परवाने व इतर सोपस्कार पूर्ण केले जात आहेत. देशाच्या सागरी किनाऱ्यांचा विकास करण्यासाठी राष्ट्रीय धोरण आराखडा तयार केला जात आहे असे गडकरी यांनी सांगितले.