बँकांना भांडवली पुनर्भरणाचा सरकारकडून पहिला हप्ता

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक, कॉर्पोरेशन बँक आणि आंध्र बँकेससह सार्वजनिक क्षेत्रातील पाच बँकांना भांडवली पूर्ततेच्या नियमांच्या पालनासाठी केंद्र सरकारने ११,३३६ कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. चालू आर्थिक वर्षांतील हे भांडवली पुनर्भरणासाठी बँकांना मिळालेला हा पहिला हप्ता असून, उर्वरित वर्षांत ५३,६६४ कोटी रुपये सरकारकडून बँकांना वितरीत केले जाणार आहेत.

अर्थमंत्रालयाने मंगळवारी जाहीर केलेल्या नियोजनानुसार, नीरव मोदी घोटाळ्याने ग्रस्त पंजाब नॅशनल बँकेला सर्वाधिक २,८१७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्या खालोखाल कॉर्पोरेशन बँकेला २,५५५ कोटी रुपये, इंडियन ओव्हरसीज बँकेला २,१५७ कोटी रुपये मिळणार आहेत. आंध्र बँकेला २,०१९ कोटी रुपये आणि अलाहाबाद बँकेला १,७९० कोटी रुपये वितरीत केले जाणार आहेत.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या रोखेधारकांना व्याजाची पूर्तता करण्यासाठी भांडवलाची तातडीने गरज असून, अशा अतीव दुर्भिक्ष असलेल्या चार ते पाच बँकांना तातडीने म्हणजे आठवडय़ाभरात अर्थसाहाय्य सरकारकडून लवकरच पुरविले जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्रालयातील वरिष्ठ सूत्रांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी या निर्णयाची घोषणा करण्यात आली.

हे भांडवली पुनर्भरण सरकारने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या २.११ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमधील चालू आर्थिक वर्षांत द्यावयाच्या ६५,००० कोटी रुपयांच्या अर्थसाह्य़ाचा एक भाग म्हणूनच केले जाणार आहे. शिवाय, अनेक सरकारी बँका चालू वर्षांत भांडवली बाजारातून आणखी ५०,००० कोटी रुपयांचा निधी उभा करण्याच्या तयारीत आहेत. २१ सरकारी बँकांपैकी १३ बँकांनी यासाठी त्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठरावही मंजूर केले आहेत. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने याकामी आघाडी घेत, समभागांची विक्री, हक्कभाग विक्री अथवा पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांना (क्यूआयपी) समभाग विक्री असे पर्याय वापरून सुमारे ८,००० कोटी रुपये उभारण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले आहे.

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका सुमारे १० लाख कोटी रुपयांच्या अनुत्पादित मालमत्तेचा (एनपीए) ताण वाहत आल्या असून, नवीन व्यवसायवाढीसाठी या बँकांनी अतिरिक्त भांडवलाची पूर्तता करणे नितांत गरजेचे बनले आहे.

कोणाला   किती मिळणार?      (कोटी रुपये)

पंजाब नॅशनल बँक                  २,८१७

कॉर्पोरेशन बँक                       २,५५५

इंडियन ओव्हरसीज बँक         २,१५७

आंध्र बँक                                २,०१९

अलाहाबाद बँक                       १,७९०