24 November 2020

News Flash

राज्याकडून १७६ टक्के अधिक कर्ज उचल

करोनाकाळातील आर्थिक तरतूद

(संग्रहित छायाचित्र)

एप्रिलपासून महाराष्ट्राने केलेली कर्ज उभारणी ३४,५०० कोटींवर

वेगवेगळ्या राज्यांच्या कर्जरोख्यांच्या बोली लावून विक्रीत सरलेल्या मंगळवारी नऊ राज्यांनी मिळून १६,८०० कोटी रुपयांची कर्ज उचल केली. उल्लेखनीय म्हणजे करोनाग्रस्त गत पाच महिन्यांत महाराष्ट्र राज्याची कर्ज उचल ३४५०० कोटींची असून, मागील वर्षांच्या तुलनेत ती १७६ टक्क्यांनी वाढली आहे.

रोखे बाजारात ‘राज्यांसाठी विकास कर्ज’ (स्टेट डेव्हलपमेंट लोन – एसडीएल) म्हणून ओळखल्या जाणारे लिलाव मंगळवारी झाले. या लिलावात गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू राज्यांच्या रोख्यांनी अतिरिक्त मागणी मिळविली. या राज्यांनी नामनिर्देशित रकमेपेक्षा १,७५० कोटी अतिरिक्त कर्ज उचलले. रिझव्‍‌र्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ७ एप्रिल ते ११ ऑगस्ट या पाच महिन्यांदरम्यान २६ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश यांनी मिळून रोखे लिलावातून २.४७ लाख कोटींची एकूण कर्ज उचल केल्याचे दिसून येते.

मागील वर्षी याच कालावधीत ही कर्ज उचल १.५५ लाख कोटी रुपये होती. रिझव्‍‌र्ह बँकेने एप्रिल महिन्यातील वाढीव मर्यादेनुसार राज्यांना सप्टेंबपर्यंत ३.४५ लाख कोटी रुपये बाजारातून उभारण्याची मुभा उपलब्ध आहे. परंतु टाळेबंदीमुळे ठप्प पडलेले अर्थचक्र आणि परिणामी अपेक्षित कर संकलन होत नसल्याने दैनंदिन खर्चासाठी राज्ये अतिरिक्त कर्ज उचल करत असल्याचे दिसत आहे.

तमिळनाडू, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि केरळ ही सर्वात जास्त कर्जउचल करणारी राज्ये आहेत. राज्यांनी केलेल्या कर्ज उभारणीत या राज्यांचा एकत्रित वाटा ७४ टक्के इतका आहे. एकूण कर्ज उभारणीपैकी बहुतेक राज्यांनी उचललेली सर्वाधिक कर्जे १० वर्षे मुदतीची असून हे प्रमाण एकूण कर्जाच्या ३७ टक्के आहे. त्या खालोखाल तीन वर्षे मुदतीची कर्जे राज्यांनी घेतली आहेत. सर्वात कमी सात टक्के कर्जे ३० वर्षे मुदतीची असल्याचे दिसत आहे.

अन्य राज्यांच्या मागील वर्षांच्या तुलनेत सर्वाधिक वाढ महाराष्ट्र राज्याच्या कर्ज उचलीत झाली असून मागील वर्षांच्या तुलनेत महाराष्ट्राची कर्ज उचल १७६ टक्क्यांनी वाढल्याचे उपलब्ध आकडेवारी सांगते. मागील वर्षे पहिल्या पाच महिन्यांत राज्याने १२,५०० कोटींची कर्ज उभारणी केली होती, या वर्षी याच कालवधीत राज्याने ३४,५०० कोटींची कर्ज उचल केली आहे. या वर्षी राज्याने उचललेल्या कर्जापैकी मोठा वाटा दोन ते तीन वर्षे मुदतीची कर्जे असल्याने ही कर्ज उचल तात्पुरत्या खर्चाच्या तरतुदीसाठी असावी, असा विश्लेषकांचा कयास आहे. सर्वाधिक वाढ झालेल्या राज्यांत कर्नाटक ४०० टक्के वाढीसह पहिल्या स्थानी असून महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरील राज्य ठरले आहे.

केंद्र आणि राज्यांच्या कर्ज उचलीचा पहिल्या सहामाहीत कल लक्षात घेता, आर्थिक वर्षांच्या उत्तरार्धातील दुसऱ्या सहामाहीत यापेक्षा अधिक कर्ज उचल होण्याची शक्यता दिसते. मात्र पुढील सहा महिन्यांत व्याजदर वाढल्याने रोख्यांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे

– मर्झबान इराणी, स्थिर उत्पन्न गुंतवणूक प्रमुख एलआयसी म्युच्युअल फंड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 14, 2020 12:15 am

Web Title: 176 per cent higher borrowing from the state abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 महागाई दर जुलैमध्ये ६.९३ टक्क्य़ांवर
2 ‘या’ त्रिसूत्रीवर आधारित असणार नवीन करप्रणाली; मोदींनी केली घोषणा
3 सोने-चांदी दरात लक्षणीय उतार
Just Now!
X