करोना संकटातही ५४ हजार ६४ रोजगार उपलब्ध

पुणे : मॅग्नेटिक महाराष्ट्र २.० अंतर्गत २०२० मध्ये परदेशी कं पन्या आणि आघाडीच्या विविध कंपन्यांशी तीन टप्प्यांत सामंजस्य करार करण्यात आले आहेत. त्यामध्ये पुणे जिल्ह्य़ात १८ हजार ३०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून त्याद्वारे ५४ हजार ६४ रोजगार तयार झाले आहेत. वर्षभरात राज्यात एकू ण आलेल्या गुंतवणुकीपैकी पुण्यात २० टक्के  गुंतवणूक झाली आहे. त्यामध्ये पायाभूत सुविधा, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाइल, लॉजिटिक्स अशा कंपन्यांचा समावेश आहे.

राज्य सरकारकडून अमेरिका, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरियासह देशातील नामांकित कंपन्यांसोबत जूनमध्ये १४ सामंजस्य करार करण्यात आले. त्याद्वारे १७ हजार ४७ कोटींची गुंतवणूक होऊन १६ हजार २३० रोजगार निर्माण झाले. नोव्हेंबरमध्ये इंग्लंड, जपान, स्पेन, सिंगापूर आणि देशातील विविध कंपन्यांसोबत १५ सामंजस्य करार होऊन ३४,८५० कोटींची गुंतवणूक झाली, तर २३ हजार १८२ रोजगारनिर्मिती झाली. डिसेंबरमध्ये  २५ सामंजस्य करार होऊन ६१,४२० कोटींची गुंतवणूक झाली, तर २,५३,८८० रोजगार निर्माण झाले आहेत. तीन टप्प्यांमधील करारांमध्ये पुणे विभागात सर्वाधिक गुंतवणूक झाली आहे.

याबाबत उद्योग पुणे विभागाचे सहसंचालक सदाशिव सुरवसे म्हणाले, विविध क्षेत्रातील परदेशी आणि देशी कं पन्यांनी पुणे विभागात मोठी गुंतवणूक के ली आहे. या क्षेत्रातील कौशल्ये तरुण-तरुणींनी आत्मसात करण्याची गरज आहे. तरच या गुंतवणुकीतून निर्माण झालेल्या रोजगाराचा लाभ राज्यातील युवक-युवतींना होईल. उत्पादन, माहिती तंत्रज्ञान, डाटा सेंटर, लॉजिस्टिक पार्क यांमध्येही पुण्यात गुंतवणूक होत आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ, दोन वर्तुळाकार रस्त्यांसारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, मनुष्यबळाची उपलब्धता, मुबलक जागा आणि मुंबई व नवी मुंबईपासून जवळ असल्याने पुण्याला उद्योगांची पसंती मिळत आहे.

विविध क्षेत्रातील कंपन्यांशी तीन टप्प्यांत करार

यावर्षांत जूनमध्ये अ‍ॅसेंडास, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी, हेंगली, ग्रेट वॉल मोटर्स आणि हिरानंदानी लॉजिस्टिक पार्क या सात कंपन्यांबरोबर सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे ७,३५० कोटींची गुंतवणूक पुण्यात करण्यात आली, तर ७,२९२ रोजगारनिर्मिती झाली. नोव्हेंबरमध्ये सहा परदेशी आणि देशी कं पन्यांशी सामंजस्य करार होऊन ६,८८० कोटींची गुंतवणूक झाली, तर १६,४०२ रोजगार निर्माण झाले. डिसेंबरमध्ये गोयल गंगा, जीजी मेट्रोपोलिस, ग्रावीस, बजाज ऑटो, अ‍ॅम्प्स फार्मटेक्स इंडस्ट्रीज, क्लीन सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी व सोनाई इटेबल इंडिया या कंपन्यांकडून ४,०६१ कोटींची गुंतवणूक होऊन ३०,३७० रोजगार झाले.

वर्ष २०२० मध्ये पुण्यातील गुंतवणूक

सामंजस्य करार  गुंतवणूक (रु.कोटींमध्ये)   रोजगार

सात                        ७,३५०                         ७,२९२

सहा                        ६,८८०                         १६,४०२

नऊ                         ४,०६१                          ३०,३७०

२२                            १८,२९१                       ५४,०६४