19 November 2019

News Flash

कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; यंदा १० टक्के वेतनवाढ होण्याची शक्यता

भारत एशिया-पॅसिफिक क्षेत्रात अग्रेसर असेल असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

येत्या वर्षात भारतीयांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०२० मध्ये भारतीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता एका अहवालाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. ग्लोबल अॅडव्हायझरी, ब्रोकिंग अँड सॉल्यूशंस कंपनी विलिस टॉवर्स वॉटसनच्या स‌लरी बजेच प्लॅनिंगच्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली आहे. पुढील वर्षी भारतीयांच्या वेतनात १० टक्क्यांची वाढ होणार असून २०१९ मध्ये झालेल्या ९.९ टक्क्यांच्या तुलनेत ही काहीशी अधिक असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.

वेतनात १० टक्के वृद्धीसह भारत एशिया-पॅसिफिक क्षेत्रात अग्रेसर असेल असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे इंडोनेशियामध्ये ८ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. तर चीनमध्ये ६.५ टक्के, फिलिपिन्समध्ये ६ टक्के आणि सिंगापूर, हाँगकाँगमध्ये ४ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. निरनिराळ्या सेक्टर्समध्ये उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा अभ्यास केल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. या अहवालाच्या मदतीनं कंपन्यांना येत्या वर्षात वेतन निश्चित करण्यास मदत मिळणार आहे. जुलै २०१९ मध्ये कंपनीनं एशिया-पॅसिफिक क्षेत्रातील २० ठिकाणी १ हजार १२८ कंपन्यांच्या ४ हजार ५२१ कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सर्व्हे केला होता. यामध्ये भारतातील ३३७ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

कोणत्या क्षेत्राला किती फायदा ?
कंपनीनं सादर केलेल्या अहवालानुसार भारतात जनरल इंडस्ट्री, केमिकल, हायटेक आणि फार्मास्युटिकल्ससारख्या सेक्टर्समध्ये १० टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. ऊर्जा क्षेत्रात २०१९ मध्ये ८.५ टक्के वेतनावाढ झाली होती. त्यातुलनेत २०२० मध्ये ९.३ टक्के वाढ अपेक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. तर फायनॅन्शिअल सर्व्हिसेज सेक्टरमध्ये यावर्षी ९ टक्के वेतनवाढ झाली होती. पुढील वर्षी या क्षेत्रात ९.७ टक्के वेतनवाढ अपेक्षित आहे. तर कंझ्युमर प्रोडक्ट्स सेक्टरमध्ये २०१९ मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनात ९.५ टक्के वाढ झाली होती. २०२० मध्ये या क्षेत्रात वेतनात ९.९ टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

First Published on November 6, 2019 10:11 am

Web Title: 2020 salary growth rate will be 10 percent in india report published jud 87
Just Now!
X