ऐतिहासिक उच्चांकावर राहण्याचा क्रम भांडवली बाजाराने सलग दुसऱ्या सत्रात कायम राखला. गुरुवारच्या व्यवहारात सेन्सेक्सने २१,४०९.६६ उच्चांकापर्यंत मजल मारली. बुधवारी २१,३३७.६७ असा सर्वोच्च स्तर पादाक्रांत केल्यानंतर दुसऱ्याच दिवशीच्या व्यवहारातही निर्देशांकात दिवसअखेर ३५.९९ अंश भर पडली आणि तो २१,३७३.६६ या नव्या टप्प्यावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी गुरुवारी ६.७० अंश वाढ नोंदवीत ६,३४५.६५ वर पोहोचला. या निर्देशांकानेही ६,३५५.६० उच्चांकापर्यंत आज मजल मारली.
आशियाई बाजारातील संथ व्यवहाराच्या जोरावर सेन्सेक्सने गुरुवारच्या व्यवहारात २१,२६४.७१ असा तळही गाठला होता, मात्र दिवसअखेर बँक, माहिती तंत्रज्ञान, दूरसंचार कंपन्यांत झालेल्या खरेदीमुळे सेन्सेक्स बंद होताना नव्या विक्रमावर स्वार झाला. उत्साहवर्धक तिमाही वित्तीय निष्कर्षांमुळे एल अ‍ॅॅण्ड टी, एचडीएफसी यांचे समभाग वधारले. डिसेंबरअखेरच्या तिमाहीत २२.४४ टक्क्यांची वाढ नोंदविणाऱ्या एल अ‍ॅण्ड टीने सेन्सेक्स-निफ्टीमध्येही वधारणेचा वरचा स्तर राखला. सेन्सेक्समधील इन्फोसिस, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, आयटीसी, भारती एअरटेल, गेल इंडिया यांनीही निर्देशांक वधारणेला साथ दिली.
व्यवहारातील ऐतिहासिक उच्चांक ७४ अंश दूर
ल्ल  मुंबई शेअर बाजाराने तेजीचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत काढले असले तरी व्यवहारातील सार्वकालिक सर्वोच्च स्तरापासून तो अद्याप ७४ अंश लांब आहे. मुंबई निर्देशांकाने ९ डिसेंबर २०१३ रोजी २१,४८३.७४ असा व्यवहारातील सर्वोच्च टप्पा गाठला होता, तर निफ्टीने याच दिवशी नोंदविलेल्या ६,३६३.९० या सार्वकालिक उच्चांकापासून काहीसेच अंतर राखून आहे.