20 September 2020

News Flash

कर संकलनात २२.५ टक्के घट

वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन २२.५ टक्क्य़ांनी घटले आहे.

 

एकीकडे वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन कमालीचे ढासळलेले असताना, चालू आर्थिक वर्षांत केंद्र सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन, १५ सप्टेंबपर्यंत प्राप्त झालेला अग्रिम कराचा दुसरा हप्ता जमेस धरून, २,५३,५३२.३० कोटी रुपये इतके झाले आहे. वर्षभरापूर्वी याच काळात जमा कर महसुलाच्या तुलनेत यंदा कर संकलन २२.५ टक्क्य़ांनी घटले आहे.

वर्षभरापूर्वी म्हणजे १५ सप्टेंबर २०१९ अखेर सरकारच्या तिजोरीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांपोटी ३,२७,३२०.२० कोटी रुपये जमा झाले होते. चालू वर्षांतील अग्रिम कराच्या अंतिम आकडेवारीची माहिती प्राप्तिकर विभागातील सूत्रांकडून वृत्तसंस्थेला दिली गेलेली नसली, तरी हा कर गोळा करणाऱ्या बँकांकडून उपलब्ध कच्चा तपशील यंदा कर संकलन लक्षणीय घटेल, असे निर्देश करणारा आहे. बँकांकडूनही दिवसअखेरीस सर्व जमा रकमेचा अंदाज घेतला जाऊन, अग्रिम कराची आकडेवारी नंतर अंतिम स्वरूपात अद्ययावत केली जाईल. एप्रिल ते जून या आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत कर संकलनातील गतवर्षांच्या तुलनेत घसरणीचे प्रमाण ३१ टक्के होते.

प्रत्यक्ष करातील दोन मुख्य घटक म्हणजे, व्यक्तिगत तसेच कंपन्यांकडून प्राप्तिकराच्या १५ सप्टेंबरअखेपर्यंत जमा दोन हप्त्यातील अग्रिम कर आणि कंपनी कर हे आहेत. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे प्रमाण १,४७,००४.६० कोटी रुपये, तर कंपन्यांचे प्राप्तिकर ९९,१२६.२० कोटी रुपये असे आहे.

आर्थिक राजधानीचा  घसरणीत १३.९ टक्के वाटा

वाढत्या संसर्गाचा सामना करावा लागत असलेल्या आणि परिणामी अर्थचक्र सुरू करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसलेल्या मुंबईचे देशाच्या कर महसुलात सर्वात मोठे (एकतृतीयांश) योगदान असते. चालू वर्षांत १५ सप्टेंबपर्यंत येथून कर संकलन ७४,७८९.६० कोटी रुपयांचे आहे, ज्यात वर्षांगणिक १३.९ टक्क्यांची घसरण झाली आहे. मुंबईतून जमा करात, व्यक्तिगत प्राप्तिकर ३४,८०८.८० कोटी आणि कंपनी कर ३२,९२१.२० कोटी रुपये  आहे. बेंगळूरु हे देशातील एकमेव केंद्र आहे ज्याने कर संकलनात (४०,६६५.३० कोटी रु.), वर्षांगणिक ९.९ टक्के वाढ नोंदविली आहे. ३,२१४.७० कोटींच्या कर संकलनासह कोची हे वर्षांगणिक ४९ टक्के अशी सर्वाधिक घसरण नोंदवणारे केंद्र ठरले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 12:15 am

Web Title: 22 point 5 percent reduction in tax collection abn 97
Next Stories
1 एटीएममधून १० हजारांपेक्षा अधिक रक्कम काढताय? लागू होणार ‘हा’ नवा नियम
2 RBI चे गव्हर्नर म्हणतात, “अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गती वाढवण्याची जबाबदारी खासगी क्षेत्राचीही”
3 करोनामुळे आर्थिक विकासाला खिळ; बिल गेट्स यांनी सांगितला नुकसानातून बाहेर पडण्याचा मार्ग
Just Now!
X