नवी दिल्ली: येथे मुख्यालय असलेली आघाडीची स्थावर मालमत्ता क्षेत्रातील कंपनी ओमॅक्स लिमिटेडने शेअर बाजारांना सूचित केल्याप्रमाणे, कंपनीच्या प्रवर्तकांनी ‘रिडिमेबल प्रीफरेन्शिअल शेअर्स’च्या माध्यमातून कंपनीच्या भागभांडवलात अतिरिक्त २४४ कोटींची गुंतवणूक केली आहे. अलीकडेच ‘सेबी’च्या किमान पब्लिक शेअरहोल्डिंगच्या नियमाचे पालन करताना, प्रवर्तकांना कंपनीतील आपले भागभांडवल ८९ टक्क्य़ांवरून ७५ टक्क्य़ांवर आणणे भाग पडले. या १४ टक्के भाग-हिश्श्याच्या विक्रीतून मिळविलेले २४४ कोटी रुपये प्रवर्तकांनी पुन्हा कंपनीतच गुंतविले आहेत. यातून कंपनीची नक्त मालमत्ता वाढून २१४७ कोटी रुपयांवर जाणार आहे.
एएमडब्ल्यू विक्री-सेवा जाळ्यात पनवेलचा अंतर्भाव
मुंबई: मध्यम व अवजड वाणिज्य वाहनांच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचा व मालवाहतूक बाजारपेठेत लक्षणीय हिस्सा राखणाऱ्या मुंबई-कळंबोली-पनवेल विभागात देशातील तिसऱ्या क्रमांकाची अवजड औद्योगिक वाहनांची निर्मात्री ‘एएमडब्ल्यू मोटर्स लि.’ने आपले अस्तित्व निर्माण केले आहे. पनवेल येथील एस एस ऑटोमोबाइल्सशी सामंजस्य करून कंपनीने येथे वाहन-विक्री, दुरूस्ती सेवा आणि सुटे भागांच्या विक्रीचे अत्याधुनिक केंद्र स्थापित केले आहे. मोठय़ा मालवाहतुकीच्या क्षेत्रात देशात होणाऱ्या एकूण उलाढालीपैकी १५ टक्के उलाढाल ही कळंबोली-पनवेल भागात होते. एएमडब्ल्यूची उत्पादने ही १६ टन ते ४९ टन वहनक्षमता विभागांमध्ये विस्तारली आहेत.