14 December 2017

News Flash

शेअर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत मावळत्या वर्षांने दिले २८% वाढीचे दान

युरोपीय आर्थिक संकटातून सावरलेल्या आणि केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या वातावरणात ऐतिहासिक २१ हजाराचा विक्रम

व्यापार प्रतिनिधी, मुंबई | Updated: December 27, 2012 12:05 PM

युरोपीय आर्थिक संकटातून सावरलेल्या आणि केंद्र सरकारच्या आर्थिक सुधारणांच्या वातावरणात ऐतिहासिक २१ हजाराचा विक्रम मोडण्याची आशा २०१२ ने फोल ठरविली. असे असले तरी या सरत्या वर्षांने गुंतवणूकदारांच्या संपत्तीत २७% भर घातली आहे. स्वत: ‘सेन्सेक्स’ या दरम्यान २५.६% ने वधारला आहे.
भांडवली बाजाराच्या दृष्टिने २०१२ चा सुरुवातीचा कालावधी युरोपातील आर्थिक मंदीच्या तणावाच्या वातावरणातच गेला २०१२ च्या शेवटाला कुठेतरी केंद्रातील आर्थिक सुधारणांच्या मालिकेने बाजाराला स्फूर्ती दिली. २०१२ चा उगम झाला तेव्हापासून डिसेंबर २०१२ पर्यंत ‘सेन्सेक्स’ २१ हजारच काय पण २३ हजाराचाही टप्पा पार करणार असे, भाकित वर्तविले जात होते. ऐन दिवाळीत तर तशी शक्यताही वाटू लागली होती. परंतु भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांची मालमत्ता ६७.७८ लाख कोटी रुपयांच्या घरात नेण्यापर्यंतच समाधान मानावे लागले आहे. २१ डिसेंबर २०१२ पर्यंत गुंतवणूकदारांची मालमत्ता २०११ च्या तुलनेत १४.५ लाख कोटी रुपये झाली आहे. अर्थात गेल्या वर्षीच्या ५३.१२ लाख कोटी रुपयांपेक्षा ही वाढ २७% अधिक आहे.
वाढती वित्तीय आणि चालू खात्यातील तूट, कमी औद्योगिक उत्पादन दर, वाढती महागाई आणि या सर्वामुळे पल्लवित झालेल्या व्याजदर कपातीच्या आशा-निराशेचे हिंदोळे या २०१२ मधील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर ‘सेन्सेक्स’च्या बाजूने बघायले गेले तर तोही वर्षभरात २५.६% वधारला. २०११ च्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा प्रमुख निर्देशांक १५,४५५ वर होता. तो २६ डिसेंबर २०१२ रोजीपर्यंत १९,४१७ पर्यंत गेला. याचाच अर्थ वर्षभरात त्यात ३,९६२ अंशांची भर पडली. तर वर्षभरापूर्वी ५ हजाराच्याही आत, ४,६२४.३० वर असणारा राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘निफ्टी’ निर्देशांक २६ डिसेंबर २०१२ पर्यंत ५,९०५ पर्यंत गेला आहे.
२०१२ ची सुरुवात तशी भांडवली बाजारासाठी युरो झोनचे संकट असूनही समाधानकारक झाली. एकटय़ा जानेवारी महिन्यात ‘सेन्सेक्स’ १,७३९ अंशांने वधारला होता. ११.२५% ही वर्षांतील तसेच सप्टेंबर २०१० नंतरची महिन्यातील सर्वात मोठी वाढ होती.
निर्गुतवणुकीच्या सरकारच्या कार्यक्रमासह भांडवली बाजारातील प्रारंभिक  भागविक्रीलाही बाजारात फारसा चांगला प्रतिसाद लाभला नाही. परिणामी, संपूर्ण वर्षभरात विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी २१ डिसेंबपर्यंत १.२१ लाख  कोटी रुपयांचा निधी भांडवली बाजारात ओतला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांकडून गेल्या     वर्षांत १.३३ लाख कोटींची सर्वोच्च गुंतवणूक  झाली होती.    

                 २०११ अखेर    २६ डिसें. २०१२     वाढ/घट
सेन्सेक्स    १५,४५४.९२    १९,४१७.४६            २५.६%
निफ्टी           ४,६२४.३०     ५,९०५.६०            २७.७%

First Published on December 27, 2012 12:05 pm

Web Title: 28 increment in assts on share investment given by ending year