टुजी ध्वनिलहरी परवाने वाटप प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने साक्षीदार म्हणून हजर राहण्यासंदर्भात बजावण्यात आलेल्यास समन्सला अनिल अंबानी यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
रिलायन्स-अनिल धीरुभाई अंबानी (एडीएजी) समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे नवनियुक्त मुख्य न्यायाधीश पी. सत्यशिवम यांनी मान्य केले असून याबाबतची सुनावणी बुधवारी (२४ जुलै) निश्चित करण्यात आली आहे. तपास संस्थेने गेल्या शुक्रवारी केलेल्या मागणीनुसार टुजी प्रकरणात साक्षीदार म्हणून अंबानी यांच्या पत्नी टिना अंबानी यांनाही खालच्या न्यायालयाने समन्स बजाविले होते. टुजी प्रकरणी कारवाई ओढवलेल्या शाहिद बलवा व विनोद गोएंका यांच्या मालकीच्या स्वान टेलिकॉममध्ये अंबानी यांच्या दूरसंचार उपकंपनीने ९९० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणात अंबानी दाम्पत्याचा सक्रीय सहभाग असल्याचा दावा करत तपास संस्थांच्या मागणीनुसार अन्य ११ जणांनाही समन्स बजाविण्यात आले आहे. रिलायन्स – एडीएजी समूहातील गौतम दोशी, सुरेंद्र पिपारा व हरी नायर हे वरिष्ठ अधिकारीदेखील सध्या याबाबतच्या चौकशीला सामोरे जात आहेत.