मुंबईत तीन दिवसांचे ‘ट्रॅव्हल मार्ट’ आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन
विशेष प्रतिनिधी, मुंबई
राज्यात आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देण्यासाठी २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय पर्यटन महोत्सव आयोजित करण्यात आला असून त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि ख्यातनाम अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत होणार आहे.
आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक देशात दुसरा असून तामिळनाडूने पहिला क्रमांक मिळविला आहे. पर्यटकांमध्ये दरवर्षी होणारी वाढ १० टक्क्य़ांवर नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी सांगितले.
ताडोबासारखी अभयारण्ये, निसर्गरम्य कोकणातील समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले यासह शेकडो पर्यटनस्थळे राज्यात आहेत. तेथे उत्तम दर्जाची हॉटेल्स, रस्ते, रेल्वे व विमानवाहतुकीची सोय यासह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्याबाबत अधिकाधिक विदेशी पर्यटकांपर्यंत माहिती पोहोचवून त्यांना आकर्षित करण्याच्या हेतूने पर्यटन विकास महामंडळाने या ‘इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट’ चे आयोजन केले आहे. हा महोत्सव गोरेगाव येथील प्रदर्शन संकुलात होणार असून त्यात ३० देशांमधील सुमारे २५० हून अधिक पर्यटन कंपन्यांमधील उच्चपदस्थ आणि अन्य संबंधित सहभागी होणार आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत ७-८ टक्क्य़ांनी दरवर्षी वाढ होत असली तरी देशात तामिळनाडूनंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आता ही वाढ किमान १० टक्क्य़ांहून अधिक करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे नायर यांनी सांगितले. वैद्यकीय सुविधा चांगल्या दर्जाच्या असल्याने अन्य देशांमधून वैद्यकीय उपचारांसाठी राज्यात अनेकजण येतात. कृषी पर्यटनाच्या अनेक संधी राज्यात आहेत.

चालू वर्षांत १२०० कोटींच्या उलाढालीचा ‘शॉप सीजे’ला वेध
व्यापार प्रतिनिधी, मुंबई<br />सणांच्या तोंडावर बाजारहाटीसाठी लोटणारी गर्दी घटल्याची पारंपरिक दुकानदारांची ओरड असली तरी, देशातील सर्वात मोठी होम शॉपिंग वाहिनी- शॉप सीजेला मात्र आताशी विक्री उलाढाल दुपटीने वाढल्याचा अनुभव आहे. लोकांचा खरेदीचा दमदार कल पाहता दिवाळीपर्यंतच्या दोन महिन्यांत साधारण त्यांच्या बाजारमंचावर ८००-९०० कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.
दूरचित्रवाणी वाहिनी, इंटरनेट आणि मोबाइल कॉमर्स अशा डिजिटल व्यापारपेठेच्या तिन्ही मंचावर अस्तित्वात असलेली एकमेव कंपनी म्हणून शॉप सीजेचे वेगळेपण आहे. २००९च्या स्थापनेपासून पहिल्या साडेपाच वर्षांतच १००० कोटी रुपयांचा उलाढाल टप्पा गाठणारी ही ती वेगाने विस्तारणारी पेठ ठरेल, असा विश्वास शॉप सीजे नेटवर्क प्रा. लि.चे नवे मुख्य विक्री अधिकारी ध्रुव चांद्री यांनी व्यक्त केला. मागील आर्थिक वर्षांतील ८५० कोटी रुपयांच्या उलाढालीत, यंदा ४० टक्के दराने वृद्धी होऊन १२०० कोटी रुपयांचा उलाढालीचा टप्पा गाठला जाईल, असे त्यांनी सांगितले.
सणोत्सवात किमतीत ६० ते ७० टक्क्यांपर्यंत सवलत आणि एकूण १० कोटी रुपयांच्या बक्षिसांची लयलूट असलेल्या ‘हर दिन दिवाली’ या विशेष मोहिमेला २३ सप्टेंबरपासून सुरू होत असल्याचे ध्रुव चांद्री यांनी सांगितले. टीटीके प्रेस्टिज, महाराजा, इलेक्ट्रोलक्स यांसारख्या आघाडीच्या नाममुद्रांशी थेट सामंजस्यातून घर व स्वैपाकघराच्या वस्तू व उपकरणे मोठय़ा सवलतीसह या निमित्ताने उपलब्ध केली जातील. शिवाय अनेक नावीन्यपूर्ण आयातीत उपकरणे, तयार वस्त्र-परिधाने व अॅक्सेसरीज् खास करून महिला ग्राहकांना लक्ष्य करून प्रस्तुत होत असल्याचे त्यांनी सांगितले. शॉप सीजेच्या ग्राहकात महिलांचा वाटा ६० टक्क्यांचा आहे.

एव्हरेस्ट इंडस्ट्रीतर्फे ‘पीईबी’साठी तांत्रिक नियमावली
मुंबई : एव्हरेस्ट उद्योग समूहाच्या एव्हरेस्ट स्टील बििल्डग सोल्यूशन्सतर्फे प्री-इंजिनीअर्ड बििल्डग (पीईबी) तंत्रज्ञानविषयक भारतातील पहिले ‘टेक्निकल मॅन्युअल’ अर्थात तांत्रिक नियमावलीचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. एव्हरेस्ट इंडस्ट्रीजच्या ‘एव्हरेस्ट स्टील बििल्डग सोल्यूशन्स’चे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष गर्ग यांच्यासोबत मुंबईतील नामवंत स्थापत्यकार व अभियंता सल्लागार या वेळी उपस्थित होते. याप्रसंगी मनीष गर्ग म्हणाले की, भारतातल्या या पहिल्या ‘टेक्निकल मॅन्युअल’मुळे संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांना देशात प्रकल्प उभारताना मदत होईल. भारतातील या क्षेत्रातील उद्योगांची उलाढाल ५,००० कोटी रुपयांची असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.
फेडरल बँकेचे ‘फेडबुक सेल्फी’
मुंबई : बँक खाते सुरू करण्यासाठीचे ‘फेडबुक सेल्फी’ हे मोबाइल अॅप खासगी क्षेत्रातील आघाडीच्या फेडरल बँकेने सुरू केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले. कोचीमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्याम श्रीनिवासन उपस्थित होते. फेडरल बँकेने फेडबुक सेल्फी हे ई-पासबुक अधिक अद्ययावत करण्यासाठी अॅप मोबाइल आधारित बँक खाते उघडण्याची सुविधा दाखल केली आहे. या अॅपचा वापर करून आधार कार्ड व पॅन कार्ड असलेल्या कोणालाही स्मार्टफोनवरून केव्हाही व कोठूनही बचत खाते सुरू करता येईल. यानंतर संबंधित ग्राहकाला त्यांचा ‘लाइव्ह अकाऊंट नंबर’ तातडीने मिळवता येईल. एकदा खाते उघडले की अॅपचे रूपांतर ग्राहकांसाठी डिजिटल पासबुकमध्ये केले जाईल. सध्या हे अॅप अॅण्ड्रॉइड व आयओएस तंत्रज्ञानावरील फोनवर उपलब्ध आहे.

पेटीएम वित्तीय सेवा व्यवसायात
मुंबई : भारताचा सर्वात मोठा मोबाइल कॉमर्स मंच असलेल्या पेटीएम आíथक सेवा व्यवसायामध्ये प्रवेश करत असून यासाठी कंपनीने मणप्पुरम फायनान्स आणि मुथुट फिनकॉर्पसह भागीदारी केली आहे. पेटीएमचा आíथक सेवा व्यवसाय ग्राहकांना पेटीएमचा वापर करत त्यांच्या कर्जाची परतफेड करण्यास सक्षम करेल, असा विश्वास यानिमित्ताने पेटीएमचे वरिष्ठ उपाध्यक्ष किरण वसीरेड्डी यांनी व्यक्त केला. पेटीएम सोने कर्ज परतफेडीसह सेवांची सुरुवात करेल. त्यानंतर कंपनी या मंचावर विमा योजनांच्या नूतनीकरणाची सुविधाही उपलब्ध करून देणार आहे. यानुसार एसबीआय जनरल इन्शुरन्स ही पेटीएमवर दाखल होणारी पहिली विमा कंपनी असेल. या अतिरिक्त सेवेबद्दल वसीरेड्डी म्हणाले की, आम्हाला भारतातील ऑनलाइन आíथक व्यवहारांकरिता योग्य बाजारपेठेत प्रवेश करण्यास ही सेवा सक्षमता प्रदान करेल. हा विभाग अद्याप पूर्णपणे विस्तारित झाला नसला तरी आम्ही आमच्या तंत्रज्ञान पायाभूत सुविधांसह या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यास सज्ज आहोत.

गोदरेज ‘किचन फीटिंग’ व्यवसाय विभागातही
मुंबई : गोदरेज समूहातील गोदरेज लॉकिंग सोल्यूशन्स अॅण्ड सिस्टीम्सने (लॉक्स) भारतातील ‘किचन फीटिंग’ व्यवसाय श्रेणीत प्रवेश केला आहे. सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या या बाजारात तूर्त हेटिक आणि स्लीक या अनुक्रमे आंतरराष्ट्रीय व देशी नाममुद्रा कार्यरत आहेत. सध्या मॉडय़ुलर किचन प्रकार खासच लोकप्रिय असून ‘किचन फीटिंग’ हा त्याचा कणा समजला जातो. गोदरेजने शहरी मध्यम वर्गाकडून मजबूत, टिकाऊ व दिसण्यास आकर्षक ‘किचन फीटिंग’ची वाढती मागणी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून नव्या व्यवसायाचा भाग म्हणून अनेक नवीन उत्पादने कंपनी आणत असल्याचे ‘गोदरेज लॉक्स’चे कार्यकारी उपाध्यक्ष व व्यवसायप्रमुख श्याम मोटवानी यांनी सांगितले. कंपनीची या गटातील उत्पादने ही ‘स्प्रे टेस्टेड’ व १५ वर्षांपर्यंत हमी असलेल्या ‘स्टेनलेस स्टील’ साहित्याने बनली आहेत. भारतात ‘किचन फीटिंग’ हा ‘मॉडय़ुलर किचन’ श्रेणीचा एक महत्त्वाचा भाग आहे. येत्या काही वर्षांत ही बाजारपेठ ६,००० कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

कॉसमॉस बँकेला दोन पुरस्कार
मुंबई : सहकारातील आघाडीच्या कॉसमॉस बँकेने नुकतेच दोन मानाचे पुरस्कार पटकावले आहेत. ‘बँकिंग फायनान्शिअल सव्र्हिसेस अॅण्ड इन्शुरन्स’तर्फे दिला जाणारा उत्कृष्ट सहकारी बँक पुरस्कारातून कॉसमॉस बँकेचे संघटनात्मक नेतृत्व, सहकार क्षेत्रातील बँकेचे योगदान या बाबी ग्राह्य़ धरण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले. या पुरस्कारामुळे बँकेने आजवर केलेल्या कार्याची दखल अधोरेखित झाल्याचे बँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी सांगितले. तर कॉसमॉस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत पोंक्षे यांना मनुष्यबळ विकासाबाबत प्रेरित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ‘एशिया पॅसिफिक एचआरएम काँग्रेस’ने सन्मानित केले. संबंधित पदावरील व्यक्तीची कार्याबद्दलची मूल्ये, सचोटी आणि कार्याचे योग्य संतुलन या आधारे या पुरस्कारांची निवड करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे दोन्ही बहुमान बँकेने बंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात स्वीकारले.