News Flash

प्राथमिक बाजार यंदा सुगीचा!

भागविक्रीतून कंपन्यांचे नववर्षांत ३० हजार कोटींचे लक्ष्य

भागविक्रीतून कंपन्यांचे नववर्षांत ३० हजार कोटींचे लक्ष्य

करोनाकाळातही २०२० मध्ये केलेल्या बहारदार कामगिरीनंतर, आगामी २०२१ सालात प्राथमिक बाजारपेठेतील सुगी कायम राहण्याचे अंदाजले जात आहे. नववर्षांत विविध ३० कंपन्यांकडून भांडवली बाजाराला धडक दिली जाईल आणि प्राथमिक समभाग विक्रीतून (आयपीओ) ३० हजार कोटींचा निधी उभारला जाणे अपेक्षित आहे.

विद्यमान २०२० सालात आजवर वेगवेगळ्या कंपन्यांनी सुमारे २५,००० कोटी रुपये भांडवली बाजारातून उभे केले आहेत. विशेषत: दोन महिन्यांत सणोत्सवाच्या तोंडावर गुंतवणूकदारांमध्ये आयपीओसाठी अर्ज करण्याची लगबग आणि उत्साह दुणावल्याचे दिसून आले आहे.

करोनाचे संक्रमण आणि टाळेबंदीने वर्षांतील एप्रिल ते जून हा संपूर्ण तिमाही कालावधी संपूर्णपणे सुना राहिला आणि जुलै-ऑगस्टही नरमाईतच सरला असतानाही २५ हजार कोटींपर्यंतचा निधी उभारणीची कामगिरी दमदारच म्हणता येईल. त्या तुलनेत २०१९ सालात १६ कंपन्यांकडून १२,३६२ कोटी रुपये, तर २०१८ सालात २४ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना आजमावताना ३०,९५९ कोटी रुपये उभारले आहेत.

आगामी २०२१ सालात ज्या कंपन्यांचा प्राथमिक बाजारपेठेत बोलबाला राहणार आहे त्यामध्ये कल्याण ज्वेलर्स, इंडिगो पेंट्स, स्टोव्ह क्राफ्ट, साम्ही हॉटेल्स, एपीजे सुरेंद्र पार्क हॉटेल्स, न्यूरेका, मिसेस बेक्टर्स फड आणि तयार खाद्यान्न वितरणातील झोमॅटो यांचा प्रामुख्याने समावेश आहे. यापैकी बहुतांश भागविक्रींनी या पहिल्या तीन महिन्यांतच बाजाराला धडक देणे अपेक्षित आहे.

एलआयसीच्या ‘मेगा इश्यू’ची प्रतीक्षा

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या उद्दिष्टाप्रमाणे भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीची प्राथमिक समभाग विक्रीचा मुहूर्तही २०२१ साल हाच ठरल्यास, आगामी वर्ष हे नव्या विक्रमाला गवसणी घालणारे ठरेल. कैक लक्ष कोटी रुपयांची उभारणी केवळ या एकमेव भागविक्रीतून केली जाईल. भारताच्या भांडवली बाजारासाठी एलआयसीची भागविक्री हा एक ऐतिहासिक क्षणच असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 1:15 am

Web Title: 30 different companies ipos worth over rs 30000 crore lined up for the new year
Next Stories
1 HDFC Bank outages: नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवा, RBI चा एचडीएफसी बँकेला आदेश
2 RBI Monetary Policy Committee Meeting : विकास दर अंदाजात सुधारणा?
3 नियामक प्राधिकरण स्थापण्याची प्लास्टिक उद्योगाची मागणी
Just Now!
X