अवैध निधी हस्तांतरणाबद्दल सेबीची कारवाई
शेअर बाजारात व्यवहारासाठी ग्राहकांकडून घेतलेल्या निधीचा वापर प्रत्यक्षात वस्तू वायदा बाजारातील व्यवहारासाठी केला गेला आणि अशा तऱ्हेने हस्तांतरणात नियमांची पूर्तता न केल्याप्रकरणी सेबीने आनंद राठी शेअर अ‍ॅण्ड स्टॉक ब्रोकर कंपनीला ३० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
भांडवली बाजारातील समभागांचे व्यवहार करणारी आनंद राठी शेअर अ‍ॅण्ड ब्रोकर, तर वस्तूंचे वायदा व्यवहार करणारी आनंद राठी कमॉडिटीज अशा या सेबीच्या अखत्यारीत येणाऱ्या दोन कंपन्यांमध्ये हा अवैध निधी हस्तांरण व्यवहार झाला आहे.
सेबीने याबाबत केलेल्या चौकशीत आनंद राठी शेअर अ‍ॅण्ड ब्रोकर व आनंद राठी कमॉडिटीज कंपन्यांदरम्यान पैसे हस्तांतरित होताना नियमांची पायमल्ली झाल्याचे आढळून आले. हा व्यवहार वर्ष २०१२-१३ दरम्यानचा आहे.
समूहातील कंपन्यांअंतर्गत निधी हस्तांतरण धोरणानुसार आनंद राठी शेअर अ‍ॅण्ड ब्रोकर कंपनीने तिच्या ग्राहकांची रक्कम आनंद राठी कमॉडिटीजमध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया २१ एप्रिल २०१४ मध्ये थांबविल्याचे ‘सेबी’ने या संबंधीच्या आदेशात स्पष्ट केले आहे.