छोटय़ा गटातील कार, कॉम्पॅक्ट-एसयूव्ही गटातील वाहनांना चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्ध वित्त वर्षांत खरेदीदारांकडून मिळालेल्या भरघोस प्रतिसादाच्या जोरावर एकूण वित्त वर्षांत भारत प्रथमच ३० लाख प्रवासी वाहन विक्रीचा टप्पा पार करण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

सर्वाधिक वाहन विक्रीत सध्या चीन हा जागतिक स्तरावर अव्वल आहे. भारताने चालू आर्थिक वर्षांत ३० लाख वाहन विक्रीचा टप्पा गाठल्यास तो याबाबतीत जर्मनीला मागे टाकून या क्षेत्रात चौथ्या स्थानावर विराजमान होईल. २६ लाख वाहन विक्रीसह सध्या ब्रिटन सहाव्या स्थानावर आहे.

२०१६-१७ च्या एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान देशातील प्रवासी वाहन विक्री तब्बल १२.३४ टक्क्यांनी वाढून १४,९४,०३९ झाली आहे. गेल्या एकूण आर्थिक वर्षांत एकूण प्रवासी वाहन विक्री २७,८९,६७८ झाली होती. त्यामुळे उर्वरित वित्त वर्षांतील प्रवासही विक्री वाढीचा राहणार असून यामुळे भारत पहिल्यांदाच वर्षभरात ३० लाख वाहन विक्री नोंदविण्याची आशा वाहन उत्पादक कंपन्यांची संघटना असलेल्या ‘सिआम’चे उपमहासंचालक सुगाजो सेन यांनी वृत्तसंस्थेजवळ व्यक्त केली.

देशात प्रवासी वाहन विक्रीच्या वाढीसाठी सध्या पूरक बाबी असून ३० लाख विक्रीचे लक्ष्य सहज शक्य आहे, असे प्राइस वॉटरहाऊसचे भागीदार अब्दुल माजीद यांनी म्हटले आहे. शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील खरेदीदारांकडे उपलब्ध होणाऱ्या अतिरिक्त रकमेमुळे यंदा वाहनांकरिता अधिक रक्कम खर्च केली जाण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली. केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू झालेला सातवा वेतन आयोग व यंदा झालेला दमदार पाऊस या धर्तीवर या क्षेत्राकरिता आशादायक चित्र असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर खरेदीदाराला यंदा अधिक संख्येने येणाऱ्या नव्या वाहनांच्या उपलब्धततेची जोडही आहे.

गेल्या महिन्यात देशांतर्गत प्रवासी वाहन विक्री १९.९२ टक्क्यांनी वाढत साडेचार वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली. सप्टेंबरमध्ये ही विक्री २,७८,४२८ झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबर २०१६ दरम्यान भारतात बहुपयोगी वाहन बाजारपेठ ४०.२४ टक्क्यांनी वाढून ३,७३,५०४ वाहनांपर्यंत विस्तारली आहे, तर केवळ कार विक्री ५.११ टक्के वाढत १०,२६,५२६ वर आहे.

untitled-25