एप्रिल ते जुलैमधील विदेशी वित्तसंस्थांच्या गुंतवणुकीवर मोठय़ा फरकाने सरशी

जुलैच्या अखेपर्यंत भांडवली बाजारात निर्देशांकांची सुरू राहिलेली विक्रमी घोडदौड ही प्रामुख्याने छोटय़ा सामान्य गुंतवणूकदारांचा वाढलेला विश्वास आणि गुंतवणुकीमुळे असल्याचा प्रत्यय मिळत आहे. एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात म्युच्युअल फंडांकडून झालेल्या ३०,००० कोटी रुपयांच्या समभाग खरेदीच्या पाठबळातून निर्देशांकांच्या तेजीला इंधन पुरविले आहे.

त्या तुलनेत विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी एप्रिल ते जुलै काळातील खरेदी ही २१,००० कोटी रुपयांची आहे. गेल्या काही वर्षांत मोठय़ा फरकाने देशी संस्थांना गुंतवणूक ओघात विदेशी संस्थांना पिछाडीवर टाकण्याचा क्रम सरलेल्या चार महिन्यांतही कायम राहिल्याचे आढळून आले. स्थावर मालमत्ता आणि सोने याकडे पाठ फिरवून गुंतवणुकीसाठी वित्तीय साधनांकडे, विशेषत: समभागांशी निगडित गुंतवणुकीबाबत एकंदर वाढलेल्या आस्थेतून हा बाजार गुंतवणुकीचे हे संतुलन बदलले आहे, अशी प्रतिक्रिया म्युच्युअल फंड गुंतवणूक संशोधनात कार्यरत फंड्सइंडिया डॉट कॉमच्या विद्या बाला यांनी व्यक्त केली.

छोटय़ा गुंतवणूकदारांकडून वाढलेल्या समभागसंलग्न गुंतवणुकीमुळेच निर्देशांकांमध्ये तेजी दिसली आहे, अशी प्रतिक्रिया बजाज कॅपिटलचे मुख्याधिकारी राहुल पारिख यांनीही दिली. उल्लेखनीय म्हणजे भारताच्या दीघरेद्देशी आर्थिक प्रगतीकडे पाहून ही गुंतवणूक केली जात आहे. व्यापार-उदिमात कोणतीही लक्षणीय गडबड निर्माण न करता वस्तू व सेवा कराची ताजी अंमलबजावणी उत्साहदायी आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

‘सेबी’कडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जुलै २०१७ या चार महिन्यांत म्युच्युअल फंडांच्या निधी व्यवस्थापकांनी एकंदर ३०,२६४ कोटी रुपयांची समभाग खरेदी केली. त्याचे महिनावार विभाजन केले असता, एप्रिलमध्ये ११,२४४ कोटी, मे महिन्यात ९,३५८ कोटी, जूनमध्ये आणखी ९,१०६ कोटी, तर जुलै महिन्यात सर्वाधिक ११,८०० कोटी रुपये गुंतविले गेले.

चार महिन्यांत बाजाराचा मुख्य निर्देशांक ‘सेन्सेक्स’ने दाखविलेल्या चढत्या भाजणीनुरूप ही गुंतवणूकदेखील वाढत आल्याचे दिसून आले आहे. सेन्सेक्सने या चार महिन्यांत तब्बल १० टक्क्यांची वाढ साधली आहे. देशातील ४२ म्युच्युअल फंड घराण्यांकडील जमा एकूण गुंतवणूक अर्थात गंगाजळीनेही जुलैअखेर २० लाख कोटी रुपयांचा अभूतपूर्व टप्पा गाठला आहे.

आगामी काळात उद्योग क्षेत्राच्या वित्तीय कामगिरीत उत्तरोत्तर सुधारणा अपेक्षित असताना, म्युच्युअल फंड घराण्यांचा भांडवली बाजाराबाबत सकारात्मक कल दोन आठवडय़ांतील ताजी घसरण पाहताही बदललेला नाही. किंबहुना नवनव्या गुंतवणूकदारांकडून यापुढेही दमदार गुंतवणुकीचा ओघ कायम राहणे अपेक्षित आहे.