सोमवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन

देशातील म्युच्युअल फंड मालमत्ता ३०.५० लाख कोटी रुपयांवर पोहोचवण्यात फंड कंपन्यांमधील महिला निधी व्यवस्थापकांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. फंड मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी ३४६ पुरुष तर आणि ३० महिला व्यवस्थापक कार्यरत आहेत. महिला निधी व्यवस्थापकांचे प्रमाण ८ टक्के असून गेल्या वर्षभरात महिला व्यवस्थापकांची संख्या २८ वरून ३० वर पोहचली आहे.

सोमवारच्या (८ मार्च) आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्ताने मॉर्निगस्टार इनव्हेस्टमेंट अ‍ॅडव्हायझरने फंड क्षेत्रातील महिला निधी व्यवस्थापकांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे.  शेवटच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, म्युच्युअल फंडात महिलांचे प्रतिनिधित्त्व ८ टक्के असले तरीही महिला अजूनही विकसित देशांच्या महिला निधी व्यवस्थापकांच्या तुलनेत भारतातील महिला निधी व्यवस्थापकांचे प्रमाण अत्यंत तोकडे असल्याचे  स्पष्ट झाले आहे.

१९ फंड घराण्यात किमान एक तरी महिला निधी व्यवस्थापक आहे. दोन फंड घराण्यात ३ निधी व्यवस्थापिका, ६ फंड घराण्यात २ निधी व्यवस्थापिका तर ११ फंड घराण्यात किमान १ निधी महिला व्यवस्थापक आहे.  या निधी व्यवस्थापकांपैकी किमान १० महिला निधी व्यवस्थापक ५ ते ३ वर्षे दरम्यान निधी व्यवस्थापन करत आहेत. ८ निधी व्यवस्थापक दोन वर्षे किंवा त्या पेक्षा कमी कालावधीसाठी निधी व्यवस्थापक आहेत. समभाग मालमत्तेपैकी महिला निधी व्यवस्थापक ४.११ लाख कोटी रुपयांचे मालमत्ता व्यवस्थापन करतात. सर्वाधिक ४३ टक्के मालमत्ता या निश्चित उत्पन्न गटात आहे. समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाच्या महिला निधी व्यवस्थापक असलेल्या फंडांच्या मालमत्तेचे प्रमाण २५.१ टक्के आहे.

महिला निधी व्यवस्थापकांच्या उपलब्ध आधारबिंदूंची पडताळणी करताना काही मनोरंजक आकडेवारी समोर आली. गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या फंडांचा आढावा घेतल्यास महिला व्यवस्थापन करत असलेल्या फंडापैकी ८० टक्के फंडांनी पुरुष निधी व्यवस्थापक असलेल्या स्पर्धक फंडापेक्षा गेले एक वर्ष कालावधीत अधिक परतावा दिला असून ५ वर्षे कालावधीत हेच प्रमाण ७४ टक्के आहे.

प्रत्येक व्यक्तीचे (फक्त स्त्रीच नव्हे) स्वत: चे प्राधान्यक्रम आणि आयुष्यातली स्वप्ने असतात. येणाऱ्या महिला दिनाच्या निमित्ताने मी गोष्ट सांगू इच्छिते की, तुमच्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी सतत प्रयत्न करत राहा. स्त्रीने आपल्या पैशांसंबंधी निर्णय घेण्यासाठी पुरुषांवर विसंबून राहू नये. त्याऐवजी कुटुंबाच्या आर्थिक निर्णयप्रक्रियेत आपला सक्रीय सहभाग असावा.

– अंजू छाजेर, वरिष्ठ निधी व्यवस्थापक, निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंड.

महिला गुंतवणूकदारांमध्ये अर्थसाक्षरता वाढत आहे. वित्तीय निर्णयाबाबत महिला गुंतवणूकदारांचा सक्रीय सहभाग वाढत असून त्या गुंतवणुकीबाबत जागरूक असल्याचे आढळते.

– लीना गोखले, सेबी नोंदणीकृत म्युच्युअल फंड वितरक.