देशाचा पॅकेजिंग उद्योग नावीन्यता आणि तंत्रज्ञान समर्थतेने वेगाने विस्तार साधत असून कैक लाख कोटींवर विस्तारलेला या उद्योगक्षेत्राचा व्याप याची प्रचीती देतो. आगामी २० वर्षांत आज जे जे काही सुटय़ा स्वरूपात बाजारात मिळते, त्यापैकी ४० टक्के जिनसा-उत्पादने वेष्टनांत गुंडाळलेली अर्थात पॅकेज्ड स्वरूपात भारतात उपलब्ध होतील, असे अंदाजले जात आहे.
धोरण अनुकूलता, नियामक कायद्यातील बदल, आरोग्यविषयक दक्षता, खानपानाच्या बदललेल्या सवयी आणि प्रवासाच्या पद्धतीतील बदल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांचा बदलता आर्थिक स्तर हे घटक पॅकेजिंग उद्योगाच्या दृष्टीने वरदान ठरत आहेत, असे प्रतिपादन एमएमआय इंडियाचे उपमुख्याधिकारी भूपिंदर सिंग यांनी केले. गोरेगाव (पूर्व) येथे मुंबई प्रदर्शन संकुलात गुरुवारपासून तीन दिवसांसाठी सुरू झालेल्या इंटरनॅशनल पॅकटेक इंडिया २०१४ आणि ड्रिंक टेक्नॉलॉजी इंडिया या दुहेरी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. एमएमआय इंडिया आणि जर्मनीच्या प्रख्यात मेसे डसेलडॉर्फ यांनी संयुक्तपणे योजलेल्या या दुहेरी प्रदर्शनाचे उद्घाटन जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्यदूत मायकेल सीबर्ट यांच्या हस्ते झाले. अन्नप्रक्रिया व पॅकेजिंग उद्योगातील विविध देशी तसेच जागतिक कंपन्यांच्या यंदा या प्रदर्शनातील सहभागात २० टक्क्य़ांची वाढ झाली असून एकूण २३० दालने सज्ज करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
नव्याने अमलात आलेल्या ‘फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया’सारख्या प्राधिकरणाद्वारे भेसळीला पायबंद घालणाऱ्या रीतसर वेष्टनांची गरज अधिकाधिक उत्पादकांना भासत जाईल, असा कयास ऑइल टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. राजीव चुरी यांनी व्यक्त केला. या संबंधाने नियम कडक आणि जाचक भासत असले तरी त्याचे व्यावसायिक फायदेही लवकरच अनुभवले जातील, असा विश्वास डॉ. चुरी यांनी व्यक्त केला. त्यामुळे येत्या काळात भाज्या आणि फळांसारख्या नाशिवंत कृषिमालाचा ताजेपणा व ते स्वच्छ स्वरूपात ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी पॅकेजिंग उद्योगाला नव्या उपाययोजना सादर करणे भाग ठरणार असून, हे एक आव्हान आणि प्रचंड मोठी व्यवसाय संधीही असल्याचे डॉ. चुरी यांनी सांगितले.