02 March 2021

News Flash

सरकारी बँकांचे ४८,२३९ कोटींनी भांडवली पुनर्भरण

बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना अनुक्रमे ४,६३८ कोटी आणि २०५ कोटी रुपये दिले जाणार आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

सार्वजनिक क्षेत्रातील १२ बँकांना आवश्यक भांडवली पर्याप्तेची मर्यादा राखण्यासाठी आणि व्यावसायिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे ४८,२३९ कोटी रुपयांचे भांडवली अर्थसाहाय्य केंद्र सरकारकडून दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी केली.

या नव्याने होत असलेल्या भांडवली साहाय्यातून सरकारी बँकांसाठी चालू आर्थिक वर्षांतील एकूण भांडवली मदत ही नियोजित १.०६ लाख रुपयांच्या तुलनेत १,००,९५८ कोटी रुपयांवर जाईल, असे केंद्रीय आर्थिक सेवा सचिव राजीव कुमार यांनी स्पष्ट केले. उर्वरित ५,००० कोटी रुपयेही नजीकच्या काळात देना बँक आणि विजया बँकेबरोबर विलीनीकरण होत असलेल्या बँक ऑफ बडोदासाठी आकस्मिक गरज उद्भवल्यास अथवा वृद्धी भांडवल म्हणून वापरात येईल, असे त्यांनी सांगितले.

या टप्प्यांतील भांडवली पुनर्भरणाची कॉर्पोरेशन बँक ही ९,०८६ कोटी रुपयांसह सर्वात मोठी लाभार्थी ठरली आहे, त्या खालोखाल अलाहाबाद बँकेला ६,८९६ कोटी रुपयांची भांडवली मदत मिळणार आहे. या दोन्ही बँका जरी रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘पीसीए’ र्निबधाखाली सध्या असल्या तरी चांगली कामगिरी करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचे नक्त अनुत्पादित मालमत्तेचे प्रमाण ६ टक्क्यांच्या पातळीखाली येत असल्याचे दिसून येत आहे. ‘पीसीए’ र्निबधातून बाहेर पडण्यासाठी अतिरिक्त भांडवली पुनर्भरण या बँकांसाठी खूपच उपकारक ठरेल, असे या संबंधाने राजीव कुमार यांनी स्पष्टीकरण दिले.

बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांना अनुक्रमे ४,६३८ कोटी आणि २०५ कोटी रुपये दिले जाणार आहेत. या दोन्ही बँका नुकत्याच रिझव्‍‌र्ह बँकेच्या ‘पीसीए’ र्निबधातून मोकळ्या झाल्या आहेत. तर अन्य चार पीसीए र्निबधाखाली असलेल्या – सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युनायटेड बँक, युको बँक आणि इंडियन ओव्हरसीज या बँकांना सरकारकडून १२,५३५ कोटी रुपयांची एकत्रित भांडवल मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2019 2:40 am

Web Title: 48239 crore capital infusion of public sector banks
Next Stories
1 ‘नाणार’च्या भवितव्याबाबत सौदी आराम्को आशावादी
2 नवउद्यमींसाठी गुंतवणूक-सुलभता
3 रिझव्‍‌र्ह बँकेकडून केंद्राला २८,००० कोटी
Just Now!
X