म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे गुंतवणूकदारांचा रस वाढला असून ऑगस्टअखेरच्या पाच महिन्यांमध्ये या पर्यायातील खात्यांची संख्या २१ लाखाने वाढून ती ५ कोटींपर्यंत पोहोचली आहे. विशेषत: किरकोळ-छोटय़ा गुंतवणूकदारांचा या पर्यायाकडे कल वाढल्याचे यावरून दिसून येते.

२०१५-१६ या गेल्या एकूण आर्थिक वर्षांत फंड खात्यांची संख्या ५९ लाखांनी वाढली होती. तर त्याआधीच्या वित्त वर्षांत ही संख्या २२ लाखांनी वाढली होती.

म्युच्युअल फंडांचे नियमन करणाऱ्या सेबीच्या मार्गदर्शनाखाली विविध ४२ फंड घराणी आपल्या अनेक योजनांद्वारे गुंतवणुकीच्या माध्यमातून निधीचे व्यवस्थापन करत असतात.

ऑगस्ट २०१६ अखेर फंड खाती ४,९७,९६,४५९ वर गेली आहेत. वर्षभरापूर्वी, ऑगस्ट २०१५ अखेर ही खाती ४,७६,६३,०२४ होती. तर  मार्च २०१६ अखेरच्या तुलनेत ही खाती २१.३३ लाखांनी वाढली आहे.

२०१६-१७ या आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते ऑगस्ट या पहिल्या पाच महिन्यात म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक २.२ लाख कोटी रुपयांनी वाढली आहे. ऑगस्टअखेर फंडातील एकूण गुंतवणूक विक्रमी अशा १५.६३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

देशातील ४२ फंड घराण्यांमध्ये महिंद्र समूहाच्या वित्त कंपनीने नुकताच प्रवेश केला आहे. कंपनीने तिच्या काही योजनाही जाहीर केल्या आहेत.

एसआयपी, इक्विटी फंडांना वाढता प्रतिसाद

म्युच्युअल फंड गुंतवणुकीतील लोकप्रिय प्रकार असलेल्या मासिक ‘एसआयपी’तील गुंतवणूकदार खात्यांची संख्या एक कोटींवर अधिक गेली असून याद्वारे ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. तर समभाग निगडित फंड खाती ११ लाखांनी वाढून ३.७१ कोटींवर गेली आहे. रोखेनिगडित योजनांची खाती ७.५ लाखांनी वाढून ९.०७ कोटी झाली आहे.

दमदार मान्सून, कंपन्यांचे आकर्षक वित्तीय निष्कर्ष, कंपनी कायदे-वस्तू व सेवा कर या रुपात आर्थिक सुधारणांना मिळणारा वेग या पाश्र्वभूमिवर गुंतवणूकदार भांडवली बाजाराबरोबरच त्याच्याशी निगडित म्युच्युअल फंडकडे गुंतवणूक म्हणून अधिक संख्येने पाहू लागल्याचे बजाज कॅपिटल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चोप्रा यांनी यानिमित्ताने नमूद केले.