दीड दिवसांत खातेदारांकडून ५३,००० कोटी जमा

अनुत्पादित मालमत्तेसाठी कराव्या लागलेल्या वाढीव तरतुदीमुळे देशातील बँकिंग अग्रणी स्टेट बँक सरलेल्या सप्टेंबर तिमाहीत तोटा नोंदविण्यापासून थोडय़ाशा फरकाने बचावली.

जून ते सप्टेंबर २०१६ तिमाहीत बँकेचा  निव्वळ नफा मागील वर्षांच्या तुलनेत तब्बल ९९.६ टक्के घटला आहे. ७.१४ टक्क्यांवर गेलेल्या बँकेच्या अनुत्पादित मालमत्तेपोटी (एनपीए)  बँकेला करावी लागलेली तरतूद ही तिपटीने वाढून १५,३२६.९१ कोटी रुपयांवर गेली आहे.

बँकेच्या तिमाही वित्तीय निष्कर्षांनिमित्त मुंबईत शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले की, गेल्या दीड दिवसांत ५३,००० कोटी रुपये बँकेच्या देशभरातील शाखांमध्ये जमा झाले.

चलनातून बाद झालेल्या ५०० व १००० रुपये मूल्याच्या नोटा जमा करण्यासाठी खातेदारांनी झुंबड सुरू आहे. त्या बदल्यात बँकेने १,५०० कोटी रुपये मूल्याच्या नोटाही बदलून दिल्याचे त्यांनी सांगितले.