विविध म्युच्युअल फंडांतून निधी काढून घेण्याऱ्या गुंतवणूकदारांचे प्रमाण मेमध्ये लक्षणीय वाढल्याचे आढळून आले. या महिन्यात गुंतवणूकदारांनी ५८,००० कोटी रुपयांची गुंतवणूक फंड योजनांमधून काढून घेतल्याचे उपलब्ध आकडेवारी दर्शविते.
म्युच्युअल फंडांचा स्थिर उत्पन्न पर्याय असलेल्या ‘गिल्ट’ तसेच ‘लिक्विड फंड’ प्रकाराकडे गुंतवणूकदारांनी पाठ फिरविल्याने मे महिन्यांत गुंतवणूक ओघापेक्षा निर्गुतवणुकीचे पारडे वरचढ ठरल्याने, गंगाजळी मोठी घट नोंदली गेल्याचे आढळले आहे. समभागाशी संलग्न म्युच्युअल फंडांच्या ‘इक्विटी योजनां’मध्ये मात्र मे महिन्यांत अतिरिक्त ४,७२१ कोटी रुपये ओतले गेले आहेत.
मे २०१५ मध्ये गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमध्ये २४३ कोटी रुपये गुंतविले होते. २०१६ च्या प्रारंभापासून मात्र म्युच्युअल फंडांकडे गुंतवणूकदारांचा ओढा प्रचंड वाढलेला असल्याचे गुंतवणुकीचे आकडे दर्शवितात. एप्रिल २०१६ मध्ये तब्बल १.७० लाख कोटी रुपयांचा ओघ म्युच्युअल फंडांनी अनुभवला आहे.
या वाढलेल्या गुंतवणुकीचे प्रतिबिंब बाजारातील वध-घटीत दिसून आले आहे. एप्रिलमध्ये स्थिर प्रवास नोंदविल्यानंतर मेमध्ये सेन्सेक्स ४.१४ तर निफ्टी ३.९५ टक्क्यांनी वाढला आहे. मार्च २०१६ मध्ये लिक्विड फंडांमध्ये ओहोटी लागल्यानंतर पुढील महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले. बँका तसेच कंपन्यांकडे गेल्या आर्थिक वर्षअखेर राहिलेल्या अतिरिक्त रकमेतील गुंतवणूक पुढील महिन्यात – एप्रिलमध्ये फंडांमध्ये गुंतविली गेल्याचे मानले जाते. ही अतिरिक्त रक्कम कंपन्यांना मार्च २०१६ मध्ये संबंधित आर्थिक वर्षांचा अग्रिम कर स्वरूपात भरावी लागली. मेमध्ये लिक्विड फंडांतील गुंतवणूक ६९,३९९ कोटी रुपयांनी कमी झाली आहे. तर गिल्ट फंडांमध्ये याद्वारे ८३७ कोटी रुपये काढून घेण्यात आले होते.
मेमधील एकूण फंड मालमत्ताही आधीच्या तुलनेत रोडावली आहे. एप्रिलमध्ये ती १४.२२ लाख कोटी रुपये अशी सर्वोच्च असताना मे २०१६ मध्ये सर्व फंड घराण्यांची एकत्रित मालमत्ता घसरून १३.८१ लाख कोटी रुपये झाली आहे.

प्रत्येक वित्तवर्षांच्या अखेरच्या महिन्यात विविध फंडातील गुंतवणूक कमी होत असते. म्युच्युअल फंडांबाबतचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा हा कल आहे. आर्थिक वर्षसमाप्ती असल्याने मोठय़ा कंपन्या त्यांची लिक्विड फंडातील गुंतवणूक काढून घेत असतात. एप्रिलमध्ये पुन्हा फंडांमध्ये ओघ दिसतो.
’ अंजनेया गौतम, वरिष्ठ उपाध्यक्ष व राष्ट्रीय प्रमुख (म्युच्युअल फंड), बजाज कॅपिटल