अति वेगवान इंटरनेट सेवा म्हणून येऊ घातलेल्या ५जी ध्वनिलहरींसाठी सर्वच दूरसचार कंपन्यांना चाचणी म्हणून भाग घेता येईल, असे दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी सोमवारी येथे स्पष्ट केले.

५जी तंत्रज्ञान हे भारताचे भविष्य असून त्याच्या प्रक्रियेत सर्वानीच सहभाग घ्यावा, असे आवाहनही प्रसाद यांनी केले. ५जी प्रत्यक्षातील अनुभवासाठी सारेच उत्सुक असल्याचेही ते म्हणाले.

दूरसंचार मंत्र्यांच्या सोमवारच्या स्पष्टीकरणाने चीनच्या हुआवे कंपनीबाबतची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. ५जी तंत्रज्ञानावर आधारित दूरसंचार सेवा भारतात देण्यास इच्छुक असलेल्या चिनी कंपनीवर सरकारने र्निबध आणले होते. मात्र प्रसाद यांनी चिनी कंपनीलाही चाचणी दरम्यान सहभागी होता येईल, असे स्पष्ट केले. कंपनीच्या भारतातील मुख्याधिकाऱ्याने याबाबत समाधान व्यक्त केले असून विद्यमान सरकार ५जी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देईल, असा विश्वास व्यक्त केला. देशात सेवा देण्यास आम्ही बांधिल असल्याचेही जे शेन यांनी म्हटले आहे. कंपनीने सप्टेंबर २०१९ मध्येच भारतातील निर्णयाबाबत सकारात्मक मत व्यक्त केले होते.

हुआवे ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील आघाडीची दूरसंचार कंपनी सध्या अमेरिकेच्या बडग्याचाही सामना करत आहे. चीनबरोबरच्या व्यापार युद्धातील एक पाऊल म्हणून अमेरिकेने हुआवे कंपनीला काळ्या यादीत टाकले आहे. भारतातील व्यवसायाबाबत मात्र कंपनीला दिलासा मिळाला आहे. भारत हा जगातील दुसरा मोठा मोबाइलग्राहकसंख्या असलेला देश आहे.