७.७८ कोटींचा विक्रम

मुंबई : म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वाढणारा कल लक्षात घेता, गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्याही (फोलियो) विक्रमी टप्प्यावर पोहोचली आहे. सप्टेंबर २०१८ अखेर म्युच्युअल फंड खाती ७.७८ कोटींवर गेली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहा महिन्यात फंड खात्यांमध्ये ६५ लाख फोलियोंची भर पडली आहे. २०१७-१८ या वित्त वर्षांत १.६० कोटी नवीन फंड खाती तयार झाले आहेत.

यापूर्वीच्या दोन्ही आर्थिक वर्षांत म्युच्युअल फंडांच्या खात्यांमध्ये वाढ नोंदली गेली आहे. ती २०१५-१७ व २०१६-१७ मध्ये ती अनुक्रमे ५९ लाख व ६७ लाखांनी वाढली आहेत.

‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया’ (अ‍ॅम्फी) ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ४१ म्युच्युअल फंड घराण्यांमधील गुंतवणूकदार खात्यांची एकूण संख्या ७,७८,८६,५९६ झाली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते सप्टेंबर २०१८ या पहिल्या सहा महिन्यांमध्ये त्यात ६५.३९ लाख खात्यांची भर पडली आहे. मार्च २०१८ अखेर ७.१३ कोटी फंड खाती होती.

‘अ‍ॅम्फी’च्या गुंतवणूक जनजागरणामुळे म्युच्युअल फंडांकडील गुंतवणूकदारांचा ओढा वाढला असून प्रामुख्याने लहान शहरातील छोटय़ा गुंतवणूकदारांकडून समभागसंलग्न फंडांना अधिक पसंती दिली जात आहे, असे ‘अ‍ॅम्फी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एन. एस. व्यंकटेश यांनी म्हटले आहे. गेल्या तिमाहीत एकूण फंडातील ओघ ४५,००० कोटींनी वाढल्याचेही ते म्हणाले.