अर्थमंत्री जेटली यांचा समाधानी सूर

आर्थिक वर्षांच्या पहिल्या सहामाहीत देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर ७.२ टक्के राहिला असून, जगातील सर्वात वेगाने विकास करीत असलेली अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान अबाधित असल्याचा समाधानी सूर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केला.

अर्थमंत्रालयाने वर्ष सांगतेचा आढावा घेताना, महागाई दर हा सुसह्य़ पातळीवर राहणे ही या वर्षांतील सर्वाधिक सुखकारक गोष्ट असल्याचे स्पष्ट केले. एप्रिल ते ऑक्टोबर २०१६ या सहामाहीत किरकोळ किमतींवर आधारित तसेच घाऊक किमतींवर आधारित महागाई दर अनुक्रमे ५.२ टक्के आणि २.७ टक्के दरावर सीमित राहिला.

सरकारने खर्चावर नियंत्रण आणि महसुलात वाढीच्या उपाययोजनांसह वित्तीय सुदृढतेवर दिलेला भर त्याचप्रमाणे महागाई दराला आटोक्यात ठेवणाऱ्या पावलांसह योजलेल्या प्रशासकीय उपाययोजनांचा एकंदर अर्थव्यवस्थेच्या स्थिर वाढीच्या दृष्टीने उत्तम योगदान दिले आहे, असे अर्थमंत्रालयाने या निमित्ताने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जागतिक स्तरावर सर्वत्र आर्थिक मंदीची छाया असताना भारतीय अर्थव्यवस्थेची लक्षवेधी कामगिरी राहिली आहे. आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती अलीकडे वाढत असल्या तरी महागाई दरावर नियंत्रणाच्या उपाययोजना निरंतर सुरू ठेवून, स्थिर स्वरूपाची अर्थवृद्धीचा क्रम चालू वर्षांच्या उर्वरित काळात सुरू राहण्याचा आशावादही या निवेदनाने व्यक्त केला आहे.

एप्रिल ते ऑक्टोबर २०१६

  • अर्थव्यवस्थेची एकंदर वाढ                       ७.२ टक्के
  • कृषी व कृषीपूरक उद्योग क्षेत्र                  २.५ टक्के
  • औद्योगिक क्षेत्र                                      ५.६ टक्के
  • सेवा क्षेत्र                                                  ९.२ टक्के
  • घाऊक महागाई दर                                 २.७ टक्के  (-२.५टक्के)
  • किरकोळ महागाई दर                             ६.१ टक्के  (४.९ टक्के)
  • रुपया / डॉलर विनिमय दर                     रु. ६६ – ६७
  • व्यापार तूट                                             ७८.२ अब्ज डॉलर (५३.२ अब्ज डॉलर)

(कंसातील आकडे आधीच्या वर्षांतील अर्धवार्षिकाचे)