करोना साथ व टाळेबंदीच्या संकटाचे सावट असलेल्या  आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये सेन्सेक्ससह निफ्टीने तब्बल ७० टक्के निर्देशांक उसळी नोंदवणारी कामगिरी केली आहे. मावळलेल्या वित्त वर्षात मुंबई निर्देशांकात २०,०४०.६६ अंशांची, त् तर निफ्टी निर्देशांकात ६,०९२.९५ अंशांची वाढ झाली आहे. टक्केवारीत हे प्रमाण अनुक्रमे ६८ व ७०.८६ आहे.

आर्थिक वर्षाची अखेर मात्र सेन्सेक्सने मोठ्या घसरणीसह केली. बुधवारच्या एकाच व्यवहारातील ६२७ अंश आपटीमुळे मुंबई निर्देशांक ५० हजारापासूनदेखील दुरावला. मंगळवारच्या तुलनेत आठवड्यातील तिसऱ्या सत्रात त्या सव्वा टक्क्याची घसरण नोंदली गेली. एक टक्का घसरणीमुळे निफ्टी १४,७०० च्या खाली आला. गुंतवणूकदारांनी बुधवारी नफावसुलीचे धोरण अवलंबिले.

देशात चालू वित्त वर्षाच्या आरंभीच करोनाचा प्रसार सुरू झाला. पाठोपाठ मार्च २०२० च्या उत्तरार्धात देशव्यापी टाळेबंदी लागू झाली. त्याच दिवशी प्रमुख निर्देशांकांनी वार्षिक तळ गाठला होता. वर्षाच्या उत्तरार्धात मात्र सेन्सेक्सने विक्रमी ५२ हजारांपर्यंत मुसंडी घेतली. १६ फेब्रुवारी २०२१ मध्ये सेन्सेक्सने ५२,५१६.७६ असा सार्वकालिक उच्चांकी टप्पा गाठला. तर याच महिन्यात ३ तारखेला त्याने ५० हजाराची अभूतपूर्व पातळी गाठली होती. ८ फेब्रुवारीला तो प्रथमच ५१ हजाराला पोहोचला होता.

३ एप्रिल २०२० ला सेन्सेक्स २७,५००.७९ अशा वर्षाच्या तळात होता. एकट्या मार्च २०२० मध्ये मुंंबई निर्देशांक ८,८२६.८० अंशांनी, २३ टक्क्यांनी आपटला होता.

२०२०-२१ मध्ये भांडवली बाजाराने गेल्या दशकभरातील सर्वोत्तम कामगिरी बजावल्याचे एम्के वेल्थ मॅनेजमेंटचे जोसेफ थॉमस  म्हणाले. आधीच्या वित्त वर्षात बाजाराने नकारात्मक (उणे ३० टक्के) परतावा दिल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

छोट्यांची मोठी कमाई

मुंबई : सामान्य गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या समभागांचा समावेश असलेल्या मुंबई शेअर बाजाराच्या स्मॉल कॅप निर्देशांकाने मावळलेल्या वित्त वर्षात ११५ टक्के उसळी नोंदवली आहे. २०२०-२१ मध्ये हा निर्देशांक ११,०४०.४१ अंशांनी वाढला आहे.

मुंबई शेअर बाजारातील मिड कॅप निर्देशांकही जवळपास १०० टक्क्यांनीच झेपावला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तो ९,६११.३८ अंश म्हणजेच ९०.९३ टक्क्यांनी वाढला आहे. तुलनेत सेन्सेक्सची वाढ कमी, म्हणजे ६८ टक्के राहिली आहे.

करोना-टाळेबंदीच्या कालावधीत भांडवली बाजाराकडे वळलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या लक्षणीय वाढली. त्यातून स्मॉल कॅप व मिड कॅप निर्देशांकांतील समभागांसाठी अधिक व्यवहार नोंदले गेल्याचे स्पष्ट होत आहे. बीएसई मिड व स्मॉल कॅप निर्देशांकांनी वित्त वर्षात किमान, अधिक असा दोलायमान प्रवासही अनेक सत्रांमध्ये अनुभवल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगच्या संशोधन विभागाचे उपाध्यक्ष अजित मिश्रा यांनी सांगितले.