ग्रामीण महाराष्ट्रात ७० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे केबल हेच टीव्हीच्या उपभोगाचे माध्यम बनले आहे, असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. केबल प्रसारणाने जमतेम ३० टक्के प्रमाण असलेल्या डीटीएच प्रसारणाला खूप पिछाडीवर सोडले असून, तर पारंपरिक उंच ठिकाणी अँटिना लावून (टेरेस्ट्रियल नेटवर्क) होणारे प्रसारण अवघे एक टक्का म्हणजे जवळपास लुप्त होण्याच्या उंबरठय़ावर असल्याचे आढळून आले आहे. या सर्वेक्षणासाठी महाराष्ट्रातील ६४.५ लाख घरांची पाहणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील टीव्ही पाहण्याच्या सवयी या अन्य राज्यांच्या तुलनेत सुस्पष्ट रूपात खूपच वेगळ्या आहेत, असे चित्र क्रोम रूरल ट्रॅक या अखिल भारतीय स्वरूपाच्या पाहणीतून पुढे आले आहे. या पाहणीने देशातील एक लाखाहून अधिक गावांतील टीव्ही प्रेक्षकांच्या सवयींचा वेध घेतला असून, जगातील ही अशा प्रकारची सर्वात मोठी पाहणी असल्याचा तिचा दावा आहे. या पाहणीचे एक रंजक वैशिष्टय़ हे की, केबल, डीटीएच आणि पारंपरिक टेरेस्ट्रियल पद्धतीच्या प्रसारणाचे प्रमाण वेगवेगळ्या राज्यांमध्ये खूपच वेगवेगळे आहे. पंजाब, हरयाणा आणि केरळ या राज्यांतील गावांमध्ये अनुक्रमे ९९.६ टक्के आणि ९९.१ टक्केटीव्ही प्रसारण हे केबलद्वारे आढळून येते, त्याच वेळी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या गावांमध्ये टीव्हीचे प्रसारण हे ६२.४ टक्के डीटीएच माध्यमातून झाले असल्याचे दिसते. क्रोम रूरल ट्रॅकच्या माध्यमातून प्रेक्षक दावेदारीचा प्रतिवाहिनी लेखाजोखा प्रथमच वास्तविक रूपात पुढे येणार आहे.