नैसर्गिक वायू, सीएनजी केंद्राच्या नवव्या टप्प्याला प्रारंभ; पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

बुधवारी सुरू होणाऱ्या १० व्या लिलाव प्रक्रियेच्या शहर वायू वितरण प्रकल्पअखेर देशभरातील ७५ टक्के लोकसंख्येपर्यंत नैसर्गिक वायू पोहोचणार असून याअंतर्गत अधिक सीएनजी केंद्र उपलब्ध होणार आहेत.

शहर वायू वितरण प्रकल्पासाठीच्या नवव्या प्रकल्पाची प्रत्यक्ष सुरुवात व दहाव्या प्रकल्पाचा प्रक्रिया प्रारंभ बुधवारी होत आहे. नवव्या टप्प्यातील ५० भागातील वायू सुविधेमुळे ५५ टक्क्य़ांहून अधिक लोकसंख्येला तर दहाव्या टप्प्यात लाभ ७५ टक्क्य़ांपर्यंतच्या लोकसंख्येला घेता येईल.

नवव्या टप्प्याअंतर्गत अदा केलेल्या ८६ भूभागांपैकी ६२ जागेवरील कामाला बुधवारपासून प्रत्यक्षात सुरुवात होत आहे. दहाव्या टप्प्यांतर्गत १२४ जिल्ह्य़ांमधील विविध ५० ठिकाणे असतील.

नवव्या टप्प्यापूर्वी ९१ भागांमध्ये ४२ लाख घरगुती ग्राहकांपर्यंत नळाद्वारे स्वयंपाकाचा वायू तर ३१ लाख वाहनांना सीएनजी पुरविला गेला आहे.

नवव्या टप्प्यातील वायू वितरणासाठीच्या प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी पार पडणार असून दहाव्या टप्प्याची सुरुवातही यावेळी होईल, अशी माहिती भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे (बीपीसीएल) कार्यकारी संचालक (वायू) राजेंद्र नाटेकर यांनी मंगळवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडचे उप सर व्यवस्थापक (वाणिज्यिक) व अशोका बिल्डकॉनचे मुकुंद चांडक हेही यावेळी उपस्थित होते. स्वस्त, जलद आणि सुरक्षित वायू यामुळे उपलब्ध होत असल्याचे नाटेकर यांनी सांगितले. स्वयंपाकाच्या पारंपरिक वायूपेक्षा नैसर्गिक वायूकरिता ग्राहकांची अधिक पसंती मिळत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

सप्टेंबर २०२६ पर्यंत देशभरात २ कोटी घरगुती जोडण्या तसेच ३८१ सीएनजी केंद्र उभारण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

वायू वितरणात अदानी, टोरंटला रस

नवव्या टप्प्यातील प्रकल्पासाठी नऊ खासगी कंपन्यांनी उत्सुकता दाखविली असून यामध्ये अदानी गॅस, टोरंट गॅस यांचा समावेश आहे. यापूर्वीच्या टप्प्याकरिता अधिकतर सरकारी वायू कंपन्यांच रस दाखवित असत. यंदा मात्र हे चित्र बदलले आहे. यंदाच्या टप्प्यात मात्र आघाडीच्या महानगर गॅस लिमिटेडने भाग घेतलेला नाही. नवव्या टप्प्यातील एकूण ८६ ठिकाणांपैकी सर्वाधिक, ७८ जागांकरिता खासगी कंपन्यांनी रस दाखविला आहे.

भारत गॅसची महाराष्ट्रात ४,००० कोटींची गुंतवणूक

नवव्या वायू टप्प्यांतर्गत बीपीसीएलची भारत गॅस रिसोर्सेस ही या क्षेत्रातील उपकंपनी वायू वितरणाकरिता महाराष्ट्रात ४,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून याद्वारे दोन पट्टय़ांमध्ये ८.५६ लाख घरगुती वायू जोडण्या व १७० सीएनजी केंद्र उभारणार आहे. कंपनीने ११ भौगोलिक ठिकाणांकरिता वायू पुरवठय़ाबाबतची निविदा मिळविली आहे. यामध्ये राज्यातील अहमदनगर-औरंगाबाद व सांगली-सातारा पट्टय़ांचा समावेश आहे.