सरकारला मोठा महसूल अपेक्षित असलेल्या देशातील दूरसंचार ध्वनिलहरी लिलावाची प्रक्रिया सोमवारी सुरू झाली. गेल्या पाच वर्षांत होत असलेल्या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी ७७,१४६ कोटी रुपयांचा बोली प्रतिसाद लाभला. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया हे त्याचे लाभार्थी ठरले.

पाच वर्षांत प्रथमच होत असलेल्या दूरसंचार ध्वनिलहरी लिलाव प्रक्रियेकरिता कंपन्यांसाठी २,२५० मेगाहर्ट्झचे परवाने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. यासाठी ४ लाख कोटी रुपये राखीव किंमत आहे. मंगळवारीही याबाबतची प्रक्रिया सुरू राहणार आहे. गटातील या ध्वनिलहरींची किंमत ३.९२ लाख कोटी रुपये आहे.

मोठय़ा मेगाहर्ट्झसाठी आघाडीच्या कंपन्यांनी बोली लावली असून ७०० व २,५०० मेगाहर्ट्झकरिता अद्यापही कोणी बोलीदार पुढे आलेला नाही, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री रवि शंकर प्रसाद यांनी स्पष्ट केले. ८००, ९००, १,८००, २,१०० आणि २,३०० मेगाहर्ट्झसाठीही बोली लागली आहे.

वर्ष २०१६ मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत प्रतिसाद न मिळालेल्या ७०० मेगाहर्ट्झसाठी एक तृतीयांश ध्वनिलहरी परवान्यांचा लिलाव झाला. तसेच दूरसंचार क्षेत्रातील अतिजलद तंत्रज्ञानासाठी ओळखले जाणाऱ्या ५जी साठीच्या ३,३००-३,६०० मेगाहर्ट्झचा यंदाच्या लिलाव प्रक्रियेत अद्याप समावेश करण्यात आलेला नाही.

२० वर्षे वैधता असलेल्या परवाना दाव्यांसाठी मंगळवारी रिलायन्स जिओ, भारती एअरटेल व व्होडाफोन आयडिया या आघाडीच्या कंपन्यांनी १३,४७५ कोटी रुपये सोमवारी जमा केले. यामध्ये एकटय़ा रिलायन्स जिओची रक्कम १०,००० कोटी रुपये आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये ती सर्वाधिक आहे. उर्वरित दोन्ही कंपन्यांनी अनुक्रमे ३,००० कोटी व ४७५ कोटी रुपये जमा केले.