‘आयपीओ’द्वारे २६,००० कोटींची सार्वजनिक उभारणी

भारताच्या भांडवली बाजाराने गुंतवणूकदारांना परताव्याबाबत मावळत असलेल्या २०१६ सालात यथातथा कामगिरी केली असली, तरी प्राथमिक बाजाराची कामगिरी मात्र दमदार राहिली आहे. वर्षभरात ८३ कंपन्यांची या बाजाराला आजमावले आणि तब्बल २६,००० कोटींहून अधिक (३.८ अब्ज अमेरिकी डॉलर) भांडवल उभे करीत दमदार बाजार प्रवेश केला.

मुंबई शेअर बाजार (बीएसई), राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि छोटय़ा उद्योगांसाठी असलेल्या एसएमई बाजारमंचांवर सूचिबद्धतेसाठी २०१६ सालात ८३ कंपन्या पुढे आल्या आणि बहुतांशांनी प्रारंभिक भागविक्रीची (आयपीओ) प्रक्रिया यशस्वीरीत्या राबविली. ही बाब गुंतवणूकदारांचा बळावलेला आत्मविश्वास तसेच नियामक यंत्रणेची विश्वासार्हता व सुयोग्य सुधारणांची अंमलबजावणीला दर्शविते, असे ‘ईवाय ग्लोबल आयपीओ ट्रेण्ड्स’च्या शेवटच्या तिमाही अहवालाने अधोरेखित केले आहे. जागतिक स्तरावरील अनेक भांडवली बाजारासाठी २०१६ साल मात्र खूपच आव्हानात्मक राहिले. राजकीय आणि आर्थिक अनिश्चितेत झालेल्या वाढीतून नरमलेल्या बाजारात, नव्याने बाजारात येऊ पाहणाऱ्या कंपन्यांची संख्या जागतिक स्तरावर २०१६ सालात १६ टक्क्यांनी घटून १,०५५ या स्तरावर आली आहे. तर त्यांनी उभारलेल्या भांडवलाचे प्रमाण या वर्षभरात ३३ टक्क्यांनी घटून १३२.५ अब्ज डॉलर इतके मर्यादित राहिले आहे.

भारतीय बाजारासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर २०१६ तिमाही हा प्रारंभिक भागविक्रीच्या दृष्टीने सर्वोत्तम काळ राहिला आहे. हे पाहता नवीन वर्षांतही हाच दमदार प्रवाह सुरू राहणे अपेक्षित आहे, असा विश्वास या अहवालाने व्यक्त केला आहे.

आगामी वर्षांत काही नवीन उद्योगक्षेत्रांकडून गुंतवणूकदारांना आजमावले जाईल, ज्यामध्ये अक्षय्य ऊर्जा स्रोतातील कंपन्या असतील. तसेच पारंपरिक बँकिंगबरोबरीनेच, विमा कंपन्या, ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रातील कंपन्यांची खुली भागविक्री घेऊन गुंतवणूकदारांना सामोऱ्या जाणे अपेक्षित आहे.

युरोपबाहेर, भारत, आफ्रिका आणि आखाती देशांमध्ये २०१७ सालातही आयपीओ बाजारपेठेत तेजी राहू शकेल, असा अहवालाचा कयास आहे.