देशातील आघाडीच्या सार्वजनिक बँकांचे गेल्या तिमाहीचे वित्तीय निष्कर्ष अधिकतर तोटा दर्शविणारेच आहे. बुधवारी एकाच दिवशी जाहीर झालेल्या पाचही सार्वजनिक बँकांचा ताळेबंद हा तोटय़ाकडे झुकणाराच होता. त्यांची एकत्रित रक्कम ६,९०० कोटी रुपयांपर्यंत जाते. तर आतापर्यंत जाहीर झालेल्या बँकांच्या तोटय़ाचा आकडा हा १०,००० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या व्यतिरिक्त विक्रमी नुकसान नोंद करणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेची रक्कम ५,००० कोटी रुपयांहून जास्त आहे. परिणामी या बँकांची वाढत्या बुडीत कर्जासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूदही तिपटीपर्यंत गेली आहे. तर वितरित एकूण कर्जापैकी थकीत कर्जाचे प्रमाण कमाल १५ टक्क्यांपर्यंत गेले आहे.