कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक ९ टक्के व्याज देण्याची तयारी सुरू आहे. वाढीव पाव टक्के व्याजदराचा लाभ चालू आर्थिक वर्षांत पाच कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ होईल. सध्या या पर्यायावर वार्षिक ८.७५ टक्के व्याज दिले जाते. गेल्या दोन आर्थिक वर्षांपासून हा दर स्थिर आहे.
चालू आर्थिक वर्षांत भविष्य निर्वाह निधीतून होणारे उत्पन्न ३४,८४४.४२ कोटी रुपये राहणार असल्याचा अंदाज असल्याने २०१५-१६ करिता भविष्य निर्वाह निधीवर वार्षिक ९ टक्के व्याजदर देता येऊ शकेल, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे विश्वस्त व भारतीय मजदूर संघाचे सरचिटणीस पी. जे. बनासुरे यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ८.९५ टक्के व्याज दिले तरी ९१ कोटी रुपये अतिरिक्त राहतात, असे समर्थनही त्यांनी केले. मात्र संघटनेने सप्टेंबर २०१५ मध्ये केलेल्या अंदाजानुसार ९ टक्के व्याज दिल्यास १०० कोटी रुपयांची कमतरता भासू शकते. संघटनेच्या वित्तीय लेखा आणि गुंतवणूकविषयक समितीने यापूर्वीच्या बैठकीत ८.९५ टक्के व्याजदराची शिफारस केली होती.
अर्थ मंत्रालयाकडून अल्प बचतीवरील व्याजदर कमी करण्याचे संकेत यापूर्वी दिले गेले आहेत. त्या उलट भविष्य निर्वाह निधीसारख्या योजनेवरील व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.