भांडवली बाजारातील तेजी कायम; सप्ताहअखेर सेन्सेक्स, निफ्टीत वाढ

मुंबई : आठवडय़ाच्या अखेरच्या सत्रातही भांडवली बाजारातील तेजी कायम राहिली. सेन्सेक्ससह निफ्टी निर्देशांक दुसऱ्या सत्रात वाढते राहिले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी १३८.५९ अंश वाढीसह ५२,९७५.८० वर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३२ अंश वाढीने १५,८५६.०५ पर्यंत स्थिरावला. दोन्ही निर्देशांक आता त्यांच्या विक्रमासह अनोख्या टप्प्यानजीक आहेत.

एक दिवस सुटी असलेल्या चालू आठवडय़ात सेन्सेक्स १६४.२६ अंशांनी वाढला. तर निफ्टीत या दरम्यान ६७.३५ अंश भर पडली. टक्केवारीत हे प्रमाण अध्र्या टक्क्यापर्यंतचे राहिले. आठवडय़ाच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्समधील ३० कंपनी समभागांपैकी आयसीआयसीआय बँकेचे मूल्य सर्वाधिक, ३.१८ टक्क्यांनी वाढले.

आयटीसी, स्टेट बँक, एचसीएल टेक, अ‍ॅक्सिस बँक, बजाज फिनसव्‍‌र्ह, टेक महिंद्र, सन फार्माही वाढले. तर लार्सन अँड टुब्रो, हिंदुस्थान यूनिलिव्हर, रिलायन्स इंडस्ट्रीज, एनटीपीसी, एशियन पेंट्स, एचडीएफसी बँक यांचे मूल्य जवळपास २ टक्क्यांपर्यंत घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांमध्ये स्थावर मालमत्ता, बँक, वित्त, पोलाद आदी १.४६ टक्क्यांपर्यंत वाढले. तर भांडवली वस्तू, दूरसंचार, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक एक टक्क्यापर्यंत घसरले. मुंबई शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या पसंतीच मिड कॅप व स्मॉल कॅप स्थिर राहिले.