आघाडीची माहिती तंत्रज्ञान कंपनी माइंडट्रीवर ताबा मिळविण्याच्या तयारीत असलेल्या लार्सन अँड टुब्रोला त्या आधीच आव्हानांच्या मालिकेला सामोरे जावे लागत आहे. माइंडट्रीमधील भागभांडवली हिस्सा टप्प्याटप्प्याने संपादित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लार्सन अँड टुब्रोच्या हालचालींविषयी खुद्द माइंडट्रीच्या प्रवर्तकांनी नाराजी व्यक्त केली आहे. माइंडट्रीच्या कर्मचाऱ्यांमध्ये यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
माइंडट्री खरेदीकरिता १०,७३३ कोटी रुपये मोजण्याची तयारी अभियांत्रिकी क्षेत्रातील आघाडीच्या लार्सन अँड टुब्रो समूहाने केली आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात प्रति समभाग ९८० रुपये दराने माइंडट्रीचे मोठे भागधारक व्ही. जी. सिद्धार्थ यांच्याकडील सर्व २०.३२ टक्के हिस्सा खरेदी करण्याकरिता बोली लावण्यात येत आहे. कंपनीवरील वर्चस्वासाठी अतिरिक्त ३१ टक्के हिस्सा खरेदी खुल्या प्रस्ताव (ओपन ऑफर) प्रक्रियेद्वारे करण्याचेही समूहाचे नियोजन आहे.
माइंडट्रीचे प्रवर्तक व कार्यकारी अध्यक्ष कृष्णकुमार नटराजन यांनी, एल अॅँड टीला हिस्सा घ्यावयाचा असल्यास थेट पर्याय उपलब्ध होता, असे नमूद करून सिद्धार्थ यांच्या बाहेर पडण्याच्या मार्गाला आक्षेप घेतला आहे. शिवाय समूहाची माहिती तंत्रज्ञान कंपनी एल अँड टी एन्फोटेकद्वारेही समूहाला हिस्सा खरेदी करणे शक्य होते, असे म्हटले आहे. नटराजन यांच्याप्रमाणेच माइंडट्रीचे सह संस्थापक असलेल्या अन्य तीन प्रवर्तकांचेही असेच मत व्यक्त केले आहे.
लार्सन अँड टुब्रोचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एस. एन. सुब्रमणियन यांनी आपण मात्र या सर्व आघाडीवर यश मिळवू, असा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच नव्या कंपनीचे समूहातील माहिती तंत्रज्ञान कंपनीबरोबर विलीनीकरण न करता तिचे स्वतंत्र अस्तित्व कायम राखले जाईल, असेही स्पष्ट केले.
लार्सन अँड टुब्रोच्या माइंडट्रीमधील स्वारस्याची सोमवारी घोषणा झाल्यानंतर मंगळवारी भांडवली बाजारात लार्सन व माइंडट्रीचे समभाग २ टक्क्यांपर्यंत घसरले. तर माइंडट्रीचे अपेक्षित विलीनीकरण होणार असलेल्या एल अँड टी इन्फोटेकचा समभाग मात्र ४ टक्क्यांनी वाढला.
माईंडट्रीच्या तुलनेत १८ पटीने मोठा असलेला व लार्सन अँड टुब्रो समूह या अपकारक आणि आक्रमक हालचालींद्वारे देशातील नवउद्यमी क्षेत्र आणि विश्वसनीय उद्योजकांपुढे नेमका काय आदर्श ठेवला जात आहे, असा सवालही माइंडट्रीचे सह संस्थापक नटराजन यांनी केला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 20, 2019 1:04 am