चंदेरी पडद्यावर दिसतो तसा प्रत्यक्ष जीवनात आमीर खान नाहीय, याचा त्यानेच आजवर प्रत्यय दिला आहे. त्याच्या याच छबीचा चांगला उपयोग गोदरेज समूहाने करून घ्यावयाचे ठरविले आहे. समूहाच्या निवडक ब्रॅण्डसाठी आमीरला सदिच्छादूत म्हणून सोमवारी करारबद्ध केल्याची घोषणा गोदरेज समूहाचे विपणन प्रमुख श्रीश जोशी व मुख्य ब्रॅण्ड अधिकारी तान्या दुभाष यांनी मुंबईत केली. परंतु आमीर खान आता समूहातील विद्युत उपकरणे, घर, फर्निचर, गुडनाईट, मॅट्रिक्स आदी नाममुद्रांसाठी प्रचारमोहिम राबविताना दिसेल. ५० कोटी भारतीयांच्या दैनंदिन जीवनात ‘गोदरेज’ असतेच असा दावा करून आमीर आता ‘हर आयडिया से जिंदगी मुस्कराये’ म्हणत अधिकाधिक ग्राहकांपर्यंत जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचणार आहे.