औद्योगिक पट्टय़ात आशादायक वातावरण

दीड-दोन दशकांपासून नाशिकमध्ये नवीन गुंतवणूक होत नसल्याचे मळभ ‘एबीबी इंडिया’च्या नव्या वीज उपकरण निर्मिती प्रकल्पाने बाजूला सारले. एबीबी इंडिया दरवर्षी देशात १० कोटी डॉलरची गुंतवणूक करते, त्यातील भरीव हिस्सा नाशिकच्या नवीन प्रकल्पात गुंतविला गेला असून, यातून औद्योगिक पट्टय़ात आशादायक वातावरण तयार केले आहे.

अद्ययावत प्रणालीचा वापर करत एबीबीने हा पहिला ‘स्मार्ट कारखाना’ कार्यान्वित केला आहे. या नव्या प्रकल्पात उत्पादित होणारी बहुतांश उत्पादने विदेशात निर्यात होणार आहेत. सातपूर औद्योगिक वसाहतीत पाच एकर जागेत उभारलेल्या नव्या निर्मिती केंद्राचे उद्घाटन व्यवस्थापकीय संचालक संजीव शर्मा, नाशिक प्रकल्पाचे प्रमुख गणेश कोठावदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी झाले. यावेळी त्यांनी नवीन विस्तारित प्रकल्पाची माहिती दिली. एबीबीचे नाशिकमध्ये गेल्या चार दशकांपासून अस्तित्व आहे. एबीबीच्या १९७८ पासून कार्यान्वित निर्मिती केंद्रात अद्ययावत पद्धतीची मध्यम-दाब ऊर्जा उत्पादने तयार केली जातात. १०० स्थानिक लघू-मध्यम उद्योजक एबीबीचे पुरवठादार आहेत. या माध्यमातून स्थानिक पातळीवर मोठी रोजगार निर्मिती झाली असल्याचे शर्मा यांनी सूचित केले.

परदेशी तंत्रज्ञान हस्तांतरित करून त्याआधारे एबीबी समूह ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत प्रारंभापासून काम करीत आहे. मध्यंतरी लागू झालेल्या वस्तू व सेवा करप्रणालीमुळे (जीएसटी) उद्योग वर्तुळात वेगळी चर्चा झाली. परंतु, या बदलाचा दूरदृष्टिकोनातून काम करणाऱ्या एबीबी समूहाला फारसा फरक पडला नाही. उलट समूहाने नवीन गुंतवणुकीसाठी पुढाकार घेतला. संपूर्ण देशातील कर प्रणालीत जेव्हा बदल झाला, तेव्हा तो स्थिरस्थावर होण्यास काही वेळ लागेल, असेही शर्मा यांनी सांगितले.

नाशिकमध्ये विद्युत उद्योगांसाठी तपासणी प्रयोगशाळा प्रस्तावित आहे. तिचा एबीबी प्रकल्पांसह स्थानिक उद्योगांना लाभ होईल, असे कोठावदे यांनी सांगितले. दरम्यान, बहुराष्ट्रीय समूहांनी नाशिकमध्ये मोठी गुंतवणूक करावी, यासाठी उद्योजक संघटना प्रयत्नशील आहे. मागील वर्षी त्यासाठी मुंबईत ‘मेक इन नाशिक’च्या आयोजनातून उद्योजकांना साद घालण्यात आली. दीड ते दोन दशकांपासून मोठा प्रकल्प नाशिकमध्ये आलेला नाही. औद्योगिक विश्व एका मर्यादेत सीमित राहिले. या स्थितीत एबीबी समूहाने गुंतवणूक करीत पुढील काळात देखील नाशिकचा विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

निर्यातीत २० टक्के योगदान!

नाशिकच्या प्रकल्पातून समूहाला आजवर बरेच काही साध्य झाले. समूहाच्या एकूण निर्यातीत नाशिकचे आजवर १० ते १२ टक्के योगदान राहिले आहे. स्थानिक पातळीवर उत्पादित होणाऱ्या उत्पादनांची गुणवत्ता आणि जर्मनीच्या प्रकल्पातील उत्पादनाची गुणवत्ता एकसमान आहे. कुशल अभियंते आणि कामगारांची या ठिकाणी उपलब्धता आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रकल्प विस्तारीकरणासाठी एबीबी समूहाने नाशिकला पसंती दिल्याचे त्यांनी नमूद केले. विस्तारित प्रकल्पामुळे निर्यातीत नाशिक प्रकल्पांचे योगदान २० टक्क्य़ापर्यंत पोहचण्याची अपेक्षा आहे. नवीन प्रकल्पात निर्मिती होणारी बहुतांश उत्पादने निर्यात होणार आहेत. या प्रकल्पाकडे मालासाठी नोंदणी होण्यास सुरुवात होईल; त्याप्रमाणे आवश्यकेनुसारमनुष्यबळ वाढविण्यात येईल, असे कोठावदे यांनी सांगितले.