25 March 2019

News Flash

छोटय़ा शहरांतील वातानुकूलन यंत्रांच्या बाजारपेठेत ३० टक्क्यांहून अधिक दराने वाढ

ब्लू स्टार आपल्या विविध एसी मॉडेल्सचे सुसूत्र समन्वय साधून त्यांची संख्या १०० वर आणली आहे.

ब्लू स्टार लिमिटेडचे सह-व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी घरगुती वापराच्या वातानुकूलन यंत्राच्या नव्या मॉडेल्सचे मुंबईत मंगळवारी अनावरण केले.  (छायाचित्र - प्रदीप दास)

‘ब्लू स्टार’चे याच बाजारवर्गाला केंद्रित करणारे धोरण

क्रयशक्तीत झालेली वाढ तसेच चांगल्या जीवनमानाच्या आकांक्षा यामुळे महानगरांव्यतिरिक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमधून वातानुकूलन यंत्र अर्थात एसीच्या मागणीतील वाढ ही तुलनेने अधिक असून आगामी पाच वर्षांत या बाजारवर्गात ३० टक्क्यांहून अधिक वृद्धीदर राहील, असा कयास या क्षेत्रातील अग्रेसर नाममुद्रा ब्लू स्टार लिमिटेडचे सह-व्यवस्थापकीय संचालक बी. त्यागराजन यांनी व्यक्त केला.

ब्लू स्टारने उच्च ऊर्जा कार्यक्षम ३ स्टार आणि ५ स्टार इन्व्हर्टर स्प्लिट एसी उपकरणाच्या ४० नवीन मॉडेल्सची प्रस्तुती करताना याच बाजारवर्गाला प्रामुख्याने लक्ष्य केले गेले असल्याचे त्यागराजन यांनी स्पष्ट केले. महानगरांमध्ये घरगुती एसीची मागणी ही स्थिरावली आहे, तर छोटय़ा शहरात ती गती पकडत असल्याचे स्पष्ट दिसत असून, यामागे किमतीचा घटकही मोठी भूमिका बजावत आहे. शिवाय विजेच्या कमी-अधिक दाबात स्टॅबिलायझरविना तग धरून शीतकरण कार्यक्षमता आणि अन्य आधुनिक वैशिष्टय़ेही कारणीभूत आहेत. ब्लू स्टारने तब्बल ५५ लाख घरगुती वापराची वातानुकूलन यंत्रांची विक्री केली असून, तिचा चालू वर्षांत मार्चअखेर बाजारहिस्सा १२ टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. परंतु बडय़ा महानगरात विक्रीतील वृद्धीदर २० टक्के तर तोच दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांमध्ये ३० टक्क्यांच्या घरात असल्याचे त्यागराजन यांनी स्पष्ट केले. आगामी पाच वर्षांत विक्रीतील वाढीची स्थिती अशीच राहणे अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वर्गासाठी आकर्षक ठरेल अशा किमतीबाबत सांगताना ते म्हणाले, विंडो एसीची सुरुवात २० हजार रुपये किमतीपासून, तर १ टन स्प्लिट इन्व्हर्टर एसी २९ हजार रुपयांपासून पुढे, दीड टन ३८ हजार ते ४२ हजार रुपये किमतीत उपलब्ध करण्यात आले आहेत. नव्या उत्पादनांच्या विपणन व प्रसिद्धीसाठी नव्या आर्थिक वर्षांत ५५ कोटी रुपये गुंतवणुकीचे कंपनीचे धोरण आहे.

ब्लू स्टार आपल्या विविध एसी मॉडेल्सचे सुसूत्र समन्वय साधून त्यांची संख्या १०० वर आणली आहे. या १०० पैकी ४० हे इन्व्हर्टर एसी आहेत. तिची नवीन ऊर्जा कार्यक्षम मॉडेल्स हे विजेच्या वापरात बचत करण्याबरोबरच, त्यात ३० टक्के अधिक शीतकरण क्षमतेची हमी असल्याचे त्यांनी सांगितले. अतिरिक्त हवा शुद्धीकरण तंत्रज्ञान आणि ०.१ अंश सेल्सियस इतक्या फरकाने तापमान जुळविण्याची सुविधा अशा वैशिष्टय़ांचा त्यात समावेश आहे. शिवाय त्यात स्मार्ट ग्राहककेंद्रित मोबाइलसमर्थ ‘कम्फर्ट कम्पॅनियन अ‍ॅप’सामावण्यात आले आहे. भारत असा ग्राहककेंद्री प्रयोग पहिल्यांदाच करण्यात आला आहे.

First Published on March 14, 2018 2:30 am

Web Title: ac prices increase blue star